Join us

'हा' अभिनेता ठरला 'फ्युचर लीडर फॉर वन एशिया' पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:41 IST

एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो एक उत्तम गायकदेखील आहे. आता या गुणी अभिनेत्यानं इतिहास रचला आहे. 

Ayushmann Khurrana : आयुषमान खुराणा (Ayushmann Khurrana) हा मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेता. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांतून आयुषमानने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर विविध विषयांवर आधारित वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न आयुषमान खुराणा करत असतो. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो एक उत्तम गायकदेखील आहे. आता या गुणी अभिनेत्यानं इतिहास रचला आहे. 

आयुषमान खुराणाने  22 व्या अनफॉरगेटेबल गालामध्ये (22nd Unforgettable Gala) 'फ्युचर लीडर फॉर वन एशिया' (Future Leader For One Asia) पुरस्कार जिंकला आहे. कॅरॅक्टर मीडिया आणि गोल्डन टीव्ही यांनी आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात आयुष्मान यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवणारा आयुष्मान खुराना हा पहिला भारतीय आहेत.

'अनफॉरगेटेबल गाला' हा आशियाई आणि पॅसिफिक आयलँड सेलिब्रिटी, प्रभावशाली व्यक्ती आणि कला, मनोरंजन व संस्कृतीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणारा कार्यक्रम आहे. दरवर्षी ५०० हून अधिक एशियन आणि पॅसिफिक आयलँडर (API) क्षेत्रातील व्यावसायिक आणि नामांकित बेवर्ली हिल्टन येथे या खास सोहळ्यासाठी एकत्र येतात.

पुरस्कार जिंकल्यानंतर आयुषमान खुराणा म्हणाला, "भारताचे एक वेगळे रूप जगासमोर आणण्याचा आणि दुर्लक्षित मुद्द्यांवर भाष्य करणे हे मला महत्त्वाचे वाटते. 'विकी डोनर', 'दम लगाके हईशा', 'शुभ मंगल ज्यादा सावधान', 'आर्टिकल १५', 'बधाई हो', 'चंदीगड करे आशिकी', 'बाला' या सारख्या सिनेमांमधून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा माझा प्रयत्न होता. मला आनंद आहे की या कथा जगभरातील लोकांना आवडल्या".

आयुष्मान पुढे म्हणाला, "दक्षिण आशियाई कलाकार आणि त्यांच्या कामांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणाऱ्या कॅरॅक्टर मीडिया आणि एशिया लॅब्स या व्यासपीठाचे मी मनापासून आभार मानतो. कला आणि सिनेमा यांना आता भाषेच्या किंवा देशाच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत. सिनेमा आपल्या सर्वांना एकत्र आणण्याची ताकद बाळगतो. हा पुरस्कार त्या सर्व भारतीय आणि दक्षिण आशियाई कथाकारांसाठी आहे, जे प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपल्या स्वप्नांची पूर्तता करतात. जगाला दाखवूया की भारत किती सुंदर आहे". 

टॅग्स :आयुषमान खुराणाबॉलिवूड