Join us

मुंगफली विकणारा मुलगा बनला बॉलिवूडचा मोठा सुपरस्टार; वाचा ‘या’ अभिनेत्याचा संघर्षमय प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 3:46 PM

बॉलिवूडचे सुपरस्टार जॅकी श्रॉफ ६० वर्षांचे झाले आहेत. २ फेब्रुवारी १९५८ रोजी दक्षिण मुंबईतील ग्रॅण्टरोडस्थित एका चाळीमध्ये जयकिशनचा (जॅकी) ...

बॉलिवूडचे सुपरस्टार जॅकी श्रॉफ ६० वर्षांचे झाले आहेत. २ फेब्रुवारी १९५८ रोजी दक्षिण मुंबईतील ग्रॅण्टरोडस्थित एका चाळीमध्ये जयकिशनचा (जॅकी) जन्म झाला.  जॅकीदाचे वडील गुजराथी होते, तर आई कझाकिस्तानची होती. जॅकी श्रॉफ यांना आज इंडस्ट्रीमध्ये यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाते. मात्र त्यांना हे यश सहज मिळालेले नाही. कारण बºयाचशा लोकांना जॅकीदाचा संघर्षमय प्रवास माहिती नाही. एका मुलाखतीदरम्यान जॅकीदाने सांगितले होते की, लहानपणी मी एखादा चित्रपट प्रदर्शित होण्याची आणि निवडणुकांची प्रतीक्षा करायचो, जेणेकरून मित्रांबरोबर मला भिंतींवर पोस्टर्स चिटकविण्याचे काम मिळावे. दुपारपर्यंत हे काम करण्याच्या मोबदल्यात मला चार आणे मिळत असत. यावेळी जॅकीदाने हेसुद्धा सांगितले होते की, एक्स्ट्रा कमाईसाठी मी १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीच्या दिवशी मुंगफली विकण्याचे काम करायचो. जे लोक परेडसाठी येत ते माझ्याकडून आवडीने मुंगफली खात असत. या मुंगफलीमधून मिळालेल्या पैशांची मी संपूर्ण आठवडा बचत करून ठेवायचो अन् रविवार आला की, चंदू हलवाईकडून जिलेबी खरेदी करायचो. शालेय शिक्षण पूर्ण केल्याच्या दोन वर्षांनंतर जॅकी श्रॉफने एका एक्सपोर्ट कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वय १९ किंवा २० वर्षे इतके असेल. याठिकाणी ते कपड्यांचे डिफेक्ट चेक करण्याचे काम करीत असत. मात्र तीन महिन्यांतच त्यांनी ही नोकरी सोडली. कारण त्यांच्या वडिलांनी त्यांना एक ट्रॅव्हल एजन्सीमध्ये नोकरी मिळवून दिली होती. जॅकी श्रॉफ यांच्या मते, मी ट्रॅव्हल आणि टुरिझमचा क्रॅश कोर्स केला होता. त्यामुळे मला ही नोकरी मिळाली होती. जेव्हा मी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करीत होतो, तेव्हा एक दिवस बसस्टॉपवर बसची प्रतीक्षा करीत होतो. तेव्हा मी बघितले की, एक अनोळखी व्यक्ती माझ्याकडे धावत आला. त्याने मला तू काय काम करतोस असे विचारले. मी लगेचच त्याला माझी जॉब प्रोफाइल सांगितली. पुढे त्या व्यक्तीने म्हटले की, माझ्याकडे एका मार्केटिंग एजन्सीची नोकरी आहे. या माध्यमातून तुला मॉडेलिंगही करता येईल. तसेच या व्यक्तीने फोटोशूट करण्याचीही आॅफर दिली. त्याबदल्यात पैसे देणार असल्याचे सांगितले.  वास्तविक जॅकीसाठी ही खूप मोठी आॅफर होती. पुढे जॅकी त्या व्यक्तीसोबत त्याच्या अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये गेले. त्याठिकाणी फोटोसेशन केले. पुढे एक यशस्वी मॉडेल बनलो. जॅकीदाला पहिलीच जाहिरात एलडी ओबरनची मिळाली होती. त्यासाठी त्यांना साडेसात हजार रुपये मिळाले. याविषयी जॅकीदाने एका मुलाखतीत सांगितले होते की, मॉडेलिंग करताना मी अ‍ॅक्टिंग क्लास चालविणारी आशा चंद्रजी यांना ओळखत होतो. आशादेखील मला मॉडेल म्हणून ओळखत होत्या. त्यांनी मला अभिनयात येण्यासाठी प्रोत्साहन दिले. परंतु मी त्यात फारसा रस दाखविला नाही. आशा यांच्या अ‍ॅक्टिंग क्लासमध्ये देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंद शिक्षण घेत होता. एके दिवशी आशा यांनी मला सुनीलच्या क्लासमध्ये बोलावले. मी सुनीलला भेटलो. कारण मला माहिती होते की, एक दिवस तो मला त्याच्या वडिलांनाही भेटायला घेऊन जाईल. मी देव आनंद यांचा खूप मोठा चाहता होतो. त्यांना भेटण्याच्या नादात मी आशा यांचा अ‍ॅक्टिंग क्लास जॉइन केला. एक दिवस माझी इच्छा पूर्ण झाली. देव आनंद यांनी मला एका होर्डिंगवर बघितले होते. त्याच दिवशी त्यांनी मला सुनीलच्या माध्यमातून भेटायला बोलावले. पुढे त्यांनी त्यांच्या ‘स्वामी दादा’ या चित्रपटात मला एक छोटीशी भूमिका आॅफर केली अन् तेथूनच माझ्या अभिनय करिअरला सुरुवात झाली. १९८२ मध्ये दिग्दर्शक सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफला ‘हिरो’ या सुपरहिट चित्रपटात अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिच्या अपोझिट साइन केले होते. पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरल्याने पुढे जॅकी श्रॉफ यांनी मागे वळून बघितले नाही.