बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायकांमध्ये अभिनेते गुलशन ग्रोवर यांचाही समावेश आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आणि ते आजही कायम आहे. त्यांनी जास्त निगेटिव्ह भूमिका केल्या आहेत. त्यामुळे त्यांना बॅडमॅन असं संबोधलं जातं.मात्र त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. त्यांनी त्यांच्या बालपणी कपडे धुण्याची पावडर विकली. स्ट्रगलिंग काळात कित्येकदा त्यांच्याकडे जेवणासाठी पैसे नव्हते. आज त्यांचा वाढदिवस असून त्यांचा जन्म दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला.
गुलशन ग्रोवर यांची दुपारची शाळा असायची. मात्र ते सकाळीच बॅगेत युनिफॉर्म घेऊन बाहेर पडायचे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, मी दररोज सकाळी माझ्या घरापासून लांब मोठमोठ्या घरांमध्ये जाऊन भांडी व कपड्यांची डिटर्जेंट पावडर विकायचो. कधी डिटर्जेंट पावडर तर कधी फिनाइल गोळ्या तर कधी पुसणी. हे सगळं विकून पैसे कमवायचो. जेणेकरून माझ्या शाळेचा खर्च निघू शकेल.
त्यांनी पुढे सांगितलं की, त्या मोठ्या घरांमध्ये राहणारे लोक माझ्याकडून सामान विकत घ्यायचे कारण मी शिकावं अशी त्यांची इच्छा होती. मी माझ्या गरीबीला कधी घाबरलो नाही. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे माझे वडील. ज्यांनी नेहमी आम्हाला प्रामाणिक व मेहनतीच्या मार्गावर चालायला शिकवलं.
गुलशन ग्रोवर यांनी सांगितलं की, ज्यावेळेस त्यांच्याकडे खाण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी कित्येक दिवस त्यांना उपाशीपोटी रहावं लागत होतं. मला सांगायला अजिबात लाज वाढत नाही मी कॉलेजमध्ये असेपर्यंत आमची हालत अशीच होती. जेव्हा अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईत आलो तेव्हा कित्येक वेळा मी भूकेलाच रहायचो. पण मी कधी हिंमत हरलो नाही.
गुलशन यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे ते नाटकात काम करायचे. ते सांगतात की खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांनी प्राण, अमरिश पूरी, अमजद खान, प्रेमनाथ यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. त्या सर्वांना पाहून स्वतःची वेगळी स्टाईल बनवण्याचा प्रयत्न केला आहे. पाहता पाहता मी प्रसिद्ध खलनायक झालो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार गुलशन ग्रोवर सुर्यवंशी व सडक २ मध्ये दिसणार आहेत.