Join us

राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना तिच्या सासऱ्यांनी ठेवलं होतं डांबून; 'या' अटीवर झाली होती सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 5:37 PM

Rani mukerji: एका मुलाखतीमध्ये राणी मुखर्जीने हा किस्सा शेअर केला होता.

'वीर-जारा', 'दिल तो पागल है', 'डर', 'दाग', 'दिवार', 'जब तक है जान' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमा देणारे निर्माता-दिग्दर्शक म्हणजे यश चोप्रा (Yash Chopra).  कथा आणि कलाकार यांची त्यांना पारख होती. त्यामुळे त्यांचे असंख्य सिनेमा सुपरहिट झाले. यश चोप्रा यांच्यासोबत त्यांच्या सिनेमात काम करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक असायचे. परंतु, अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) हिने चक्क एका सिनेमात यश चोप्रा यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. इतकंच नाही तर राणीचा नकार होकारामध्ये बदलण्यासाठी त्यांनी चक्क तिच्या आई-वडिलांना कोंडून ठेवलं होतं.

एका मुलाखतीमध्ये राणी मुखर्जीने हा किस्सा शेअर केला होता. यश चोप्रा साथिया हा सिनेमा करत होते. या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी त्यांनी राणी मुखर्जीला ऑफर दिली होती. परंतु, या सिनेमासाठी राणीने नकार दिला. तिचे आई-वडील या सिनेमाला नकार देत असल्यामुळे तिने तो न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिचा होकार मिळवण्यासाठी यश चोप्रांनी शक्कल लढवली.

"मला चांगलं आठवतंय. यश अंकलने माझ्या आई-वडिलांना (राम आणि कृष्णा मुखर्जी) त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावं होतं. त्यावेळी राणीला या सिनेमात काहीही रस नाही हे सांगण्यासाठी माझे आई-वडील यश अंकलच्या ऑफिसमध्ये गेले. त्यावेळी त्यांनी मला कॉल केला आणि म्हणाले, बेटा, तू फार मोठी चूक करत आहेस. मी माझ्या खोलीचा दरवाजा बंद करतोय. जोपर्यंत तू होकार देत नाहीस तोपर्यंत मी खोलीचं दार उघडणार नाही. पण, त्यांनी असं केलं यासाठी मी त्यांची आभारी आहे", असं राणी म्हणाली.

दरम्यान, 'साथिया' हा सिनेमा २००२ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात राणीसोबत अभिनेता विवेक ओबेरॉयने स्क्रीन शेअर केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. इतकंच नाही तर त्यातील गाणीही सुपरहिट ठरली. 

टॅग्स :राणी मुखर्जीयश चोप्राबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा