भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला जगातील कोणताच व्यक्ती ओळखत नाही असे होणे शक्यच नाही. युवीने दीर्घकाळ भारतासाठी मधल्या फळीत चमकदार कामगिरी केली. आता अलीकडे युवराज सिंगच्या बायोपिकची चर्चा जोरात सुरू आहे. नुकतंच युवराज सिंगने त्याच्या बायोपिकमध्ये कुणी त्याची भूमिका साकारायला हवी याबाबत खुलासा केला आहे. युवराज सिंगने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचं नाव घेऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे.
अलीकडेच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये युवराज सिंगला त्याच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारला आला. उत्तरात युवराज म्हणाला, 'मी नुकताच 'अॅनिमल' पाहिला आहे आणि मला वाटते की रणबीर कपूर माझ्या बायोपिकसाठी योग्य आहे. तसे तर हा पूर्णपणे दिग्दर्शकाचा निर्णय आहे. आम्ही सध्या त्यावर काम करत आहोत आणि लवकरच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येऊ'.
युवराज सिंग हा भारतीय क्रिकेट संघाचा असाच एक खेळाडू आहे, ज्यानं क्रिकेटच्या मैदानावरच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही मोठा संघर्ष केला आहे. अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित युवराज सिंग क्रिकेटच्या जगात ठसा उमटवण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या अनेक तरुणांसाठी एक आदर्श आहे. त्याने कॅन्सरवर मात करून आपले नवीन आयुष्य सुरू केलं. 2011 मध्ये माजी क्रिकेटर युवराज सिंगला त्याच्या फुफ्फुसांमध्ये कर्करोग झाला होता, जो फार दुर्मिळ आहे.
खरं तर बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते जगजाहीर आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी क्रिकेटपटूंच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारली आहे. भारतीय पुरूष संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या 'द अनटोल्ड स्टोरी' बायोपिकमध्ये दिवंगत अभिनेता सुशात सिंग राजपूतने कॅप्टन कूलची भूमिका साकारली होती. याशिवाय भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजच्या 'शाब्बास मिथू' या बायोपिकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने मितालीची भूमिका साकारली आहे. हे दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.