अभिनयाच्या क्षेत्रातील व्यक्ती आता राजकीय वर्तुळात प्रवेश करतेय, यात काही नाविण्य नाही. आत्तापर्यंत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी राजकारणात आवडीने प्रवेश घेतला आहे. आता हेच बघा ना, राजकारणाच्या रिंगणात युवापिढीही येऊ पाहतेय ही खरंच अभिमानाची बाब आहे. कलाक्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पिकर हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बाब आहे. नक्कीच आम्ही ती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हाला वाचून आनंद वाटेल की, ईशा कोप्पिकर ही आता राजकारणात प्रवेश करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे.
सुत्रांनुसार, भाजपने षण्मुखानंद सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी देशव्यापी वाहतूक संघटनेची घोषणाही केली जाणार आहे. त्यामुळे ईशा कोप्पीकरकडे या संघटनेची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या काळात बॉलिवूड कलाकारांच्या स्टारडमचा वापर करून प्रचार करण्याची रणणीती आखण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ईशा कोप्पीकरची भाजप एन्ट्री महत्त्वाची ठरणार आहे.
ईशाने आत्तापर्यंत हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड अशा विविध भाषेतील चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'एक विवाह ऐसा भी' या चित्रपटात तिने सोनू सुदसोबत मुख्य भूमिका साकारली होती. आता कलाक्षेत्राप्रमाणे राजकीय क्षेत्रात ईशाची कामगीरी कशाप्रकारे असेल, याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. चित्रपटांमध्ये तिने डॅशिंग भूमिका केल्या आहेत, त्याचप्रमाणे ती आता राजकीय रिंगणात कशाप्रकारे स्वत:ला सिद्ध करते, हे बघणे रंजक ठरणार आहे.