'गली बॉय' या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे सिद्धांत चतुर्वेदी (siddhant chaturvedi). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर आज सिद्धांतने कलाविश्वात त्याची हक्काची जागा मिळवली आहे. त्यामुळे कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्यांच्या यादीत त्याचं आवर्जुन नाव घेतलं जातं. आज सिद्धांतचा वाढदिवस आहे. आज तो ३० वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सिद्धांतचं नेटवर्थ किती आहे आणि कोणत्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतो हे जाणून घेऊया…
सिद्धांत चतुर्वेदी यांचा जन्म 29 एप्रिल 1993 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील चार्टर्ड अकाउंटंट असून आई गृहिणी आहे. जेव्हा तो पाच वर्षांचा होता, तेव्हा त्याचं कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं. सिद्धांतनं मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी घेतली आहे. सिद्धांतच्या वडिलांची इच्छा होती की त्यानं सीए व्हावं, पण सिद्धांतला त्यात काही रस नव्हता. तरीही त्यांनी वडिलांसाठी सीएचे शिक्षण घेतलं.
सीएच्या अभ्यासादरम्यान सिद्धांतने मॉडेलिंगकडेही लक्ष दिले. त्यानं टाइम्स ऑफ इंडियाज फ्रेश फेस कॉन्टेस्ट (२०१३) मध्ये भाग घेतला आणि तो जिंकलाही. सिद्धांत पहिल्यांदा 'लाइफ सही है'मध्ये दिसला होता, ज्यामध्ये 4 रूममेट्सची कथा दाखवण्यात आली होती. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर येणाऱ्या 'इनसाइड एज'मध्ये सिद्धांत पाहायला मिळाला. 'इनसाइड एज'च्या सक्सेस पार्टीमध्ये झोया अख्तरने सिद्धांतला चित्रपटाची ऑफर दिली.
सिद्धांतने 'बंटी और बबली 2', 'गहराईयां' ,'फोन भूत' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, सिद्धांत आज कोट्यवधींचा मालक आहे. तो एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रुपये घेतो. सिद्धांतची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये आहे.सिद्धांत त्याच्या कुटुंबासोबत एका लग्झरी फ्लॅटमध्ये राहतो. त्याला अनेक महागड्या गाड्यांची आवड आहे. GQ India ने 2022 साली टॉप 30 प्रभावशाली तरुण भारतीयांच्या यादीत सिद्धांत चतुर्वेदीचा समावेश केला होता. 2023 मध्ये फोर्ब्स एशियाने 30 वर्षाखालील 30 च्या यादीत त्याचा समावेश केला होता. "खो गये हम कहाँ" या वेब फिल्ममध्ये सिद्धांत शेवटचा दिसला होता. सध्या चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता आहे.