बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut Latest News) अभिनयासह तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती अनेक विषयांवर तिची मतं मांडत असते. कंगना तिच्या दमदार अभिनयामुळे आणि बेधडक स्वभावामुळे ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून कंगना राजकारणात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. विशेष म्हणजे कंगनानं देखील तिच्या राजकीय प्रवेशाविषयी वक्तव्यं केली आहे. आता यातच पुन्हा एकदा कंगनाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निवडणूक लढवण्यावर भाष्य केलं.
लोकसभा निवडणुकीत सहभागी होण्याचा विचार आहे का? या प्रश्नावर कंगनानं उत्तर देत राजकारणात येण्याची हीच योग्य वेळ असल्याचं म्हटलं. 'टीव्ही ९ भारतवर्ष'शी संवाद साधताना कंगना म्हणाली, 'मी निवडणूक लढवायची की नाही हे जाहीर करण्याचा अधिकार मला नाही. मात्र, राजकारणात नसतानाही मी एक जागरूक महिला आहे. मी नेहमीच माझ्या देशासाठी काम केलं आहे'.
पुढे ती म्हणाली, 'चित्रपटाच्या सेटवरूनही मी राजकीय पक्षांशी लढले आहे. मी राजकारणात राहो किंवा न राहो, मी माझ्या देशासाठी काम करत राहीन. हे सर्व करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. मात्र, जर मला राजकारणात येण्याची संधी मिळाली तर मला राजकारणात येण्यास नक्कीच आवडेल आणि हीच योग्य वेळ आहे असे मला वाटतं'.
राष्ट्रवादाबद्दल बोलताना कंगना म्हणाली, 'या देशाने आणि जनतेने मला पंख दिले आहेत. प्रेम दिलं आहे. मी उत्तर भारतातून आले आहे, मी दक्षिणेत काम केलं आहे, मी दिल्लीच्या, हरियाणाच्या मुंलींची भुमिका साकारल्या आहेत. मध्य भारतातील 'झाशी की रानी' ही भूमिका केली आहे. या देशाने मला खूप काही दिलं आणि आता परत देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी नेहमीच राष्ट्रवादी राहिले आहे'.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, लवकरच तिचा 'इमर्जन्सी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिने भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. प्रेक्षक कंगनाच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. एकापाठोपाठ चित्रपट फ्लॉप झाल्यावर कंगनाच्या "इमर्जन्सी'कडे लोकांच्या नजरा आहेत.