बॉलिवूडचे ‘पाणबुडी’ कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2016 8:31 AM
भारतीय नौसेनेत दाखल होण्यासाठी फ्रान्सच्या मदतीने बनविण्यात येत असलेल्या ‘स्कॉर्पिन’ या सहा पाणबुड्यांचे दस्तावेज व कॉन्फिडेंशियल डाटा लिक झाल्याची ...
भारतीय नौसेनेत दाखल होण्यासाठी फ्रान्सच्या मदतीने बनविण्यात येत असलेल्या ‘स्कॉर्पिन’ या सहा पाणबुड्यांचे दस्तावेज व कॉन्फिडेंशियल डाटा लिक झाल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विदेशी मीडियाकडून ही माहिती लिक झाल्याचे बोलले जात असल्याने, भविष्यात विदेशी मीडियाला भारतीय संरक्षण विभागात महत्त्वपूर्ण असलेल्या यंत्रांपासून दूर ठेवले जाईल यात शंका नाही. मात्र त्याचबरोबर बॉलिवूडपटांमध्ये दाखविण्यात येत असलेल्या पाणबुड्यांच्या चित्रीकरणावरदेखील बॅन येऊ शकतो का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण आतापर्यंत ‘पाणबुडी’ या एकाच विषयावर आधारित बरेच चित्रपट बनविण्यात आले आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या नेव्ही कमांडर कवास माणेकशॉ नानावटी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘रुस्तम’ या चित्रपटातदेखील पाणबुडीचा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वीदेखील बºयाचशा चित्रपटांमध्ये ‘पाणबुडी’ दाखविण्यात आली असून, त्याचा घेतलेला हा आढावा... बोस : द फोरगोटन हिरोसन २००५ मध्ये आलेल्या ‘बोस : द फोरगोटन हिरो’ या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर आधारित चित्रपटातदेखील पाणबुडी दाखविण्यात आली आहे. श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नेताजींची भूमिका अभिनेता सचिन खेडेकर यांनी साकारली होती. युद्धजन्य स्थितीच्या एका दृश्यात पाणबुडी दाखविण्यात आली आहे. चित्रपटात भारतीय क्रांतिकारकांचे आणि नेताजींच्या सैन्याचे सामर्थ्य दाखविण्यात आले आहे. फॅँटमसाजिद नाडियादवाला दिग्दर्शित ‘फॅँटम’ या अॅक्शनपटात पाणबुडी दाखविण्यात आली आहे. आतंकवादावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये पाणबुडीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पाकिस्तानातून समुद्रमार्गे परतताना पाणबुडीच्या माध्यमातून सैफ अली खान आणि कॅटरिना कैफ भारतात सुरक्षितपणे पोहोचतो, असे अखेरचे दृश्य आहे. यावेळी पाणबुडीची भव्यता तसेच पाणबुडीच्या आत असलेली यंत्रणा दाखविण्याचा निर्मात्यांनी प्रयत्न केला आहे. चित्रपटाची कथा एस. हुसेन जैदी यांची कादंबरी ‘मुंबई एवेंजर्स’ यावर आधारित आहे. ब्लूबॉलिवूडचा पहिला अंडरवॉटर ‘ब्लू’ या चित्रपटात पाण्याखालची दुनिया दाखविण्यात आली आहे. समुद्रात बुडालेल्या ‘द लेडी इन ब्लू’ या जहाजामधील खजिना काढण्यासाठीचा आटापिटा यात दाखविण्यात आला आहे. चित्रपटात अक्षयकुमार, संजय दत्त, जायद खान, लारा दत्ता यासारखी तगडी स्टारकास्ट आहे. खजिना काढण्यासाठी जेव्हा अक्षयकुमार, जायद खान आणि संजय दत्त पाण्याखाली जातात तेव्हा त्यांना बुडालेली पाणबुडी, जहाजाचे अनेक अवशेष दिसतात. चित्रपटात अंडरवॉटर स्टंट गर्ल आणि आॅस्ट्रेलियन गायिका काइली मिनॉग हिचे ‘चिगी विगी’ हे गाणे हिट झाले होते. सम्राटबॉलिवूडला पाणबुडीचे आकर्षण अलीकडच्या काळात नव्हे तर सुरुवातीपासूनच राहिले आहे. याचे उत्तम उदाहरण १९८२ मध्ये आलेल्या ‘सम्राट’ या चित्रपटाचे देता येईल. ‘सम्राट’ नावाचे जहाज खजिना घेऊन समुद्रात बुडत असते. हा खजिना काढण्यासाठी राम आणि राजू म्हणजेच धर्मेंद्र आणि जितेंद्र या दोन गोताखोरांची धडपड सुरू असते. खजिना लुटणे हा एकमेव उद्देश या दोघांचा नसतो. तर समुद्रातील तस्करांचा छडा लावण्यासाठीदेखील त्यांची धडपड चित्रपटात दाखविण्यात आली आहे. पाणबुडीतून हे दोघेही त्या खजिन्यापर्यंत पोहोचतात. सम्राट हॉलिवूडच्या ‘टायटॅनिक’ या चित्रपटाच्या अगोदर बनविण्यात आल्याने चित्रपटातील दृश्य सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारे ठरले. त्या वेळी या चित्रपटाची गणना अॅक्शन थ्रिलर चित्रपटात करण्यात आली. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. गाझीबाहुबली चित्रपटात भल्लालदेवाची भूमिका करणारा राणा दुग्गुबाट्टी सध्या ‘गाझी’ नावाची त्रैभाषिक चित्रपट करण्यात व्यस्त आहे. नुकतेच त्याने आठ दिवस-रात्र पाण्याखाली शूटिंग केले आहे. एका भव्य पाणबुडीवर आधारित असलेल्या या चित्रपटात राणाने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. यात पाणबुडीचे सहा विभाग तयार करण्यात आले आहेत. पाकिस्तानी पाणबुडी युद्धनौका ‘गाझी’वर हा चित्रपट आधारित आहे. १९७१च्या बांगलादेशमुक्तीच्या युद्धात भारताला या पाणबुडीला विशाखापट्टणममध्ये जलसमाधी देण्यात यश आले होते.चित्रपट या वर्षाच्या अखेरीस हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.