हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘हिरो’ अशी अभिनेता जॅकी श्रॉफची ओळख. मुंबैय्या डायलॉग शैली, वागणं मुंबैय्या.. यामुळे जॅकीनं रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. अभिनयातील वैविधता आणि भूमिका कोणतीही असो त्याला पुरेपूर न्याय जॅकीने दिला आहे. प्रमुख अभिनेता, सहकलाकार, खलनायक किंवा मग कॉमेडी...भूमिका कोणतीही असो जॅकीने त्याला पूर्ण न्याय दिला आहे. जॅकीचे खासगी आयुष्यही तितकेच यशस्वी आहे. जॅकी आणि त्याची पत्नी आयेशाचा सुखी संसार सुरु आहे. जॅकी आणि आयेशाची लव्ह स्टोरीसुद्धा खास आहे. जॅकी एकदा रेकॉर्डिंगसाठी जात होता. बस स्टॉपवर तो बसची वाट पाहत होता. त्याचवेळी बसमध्ये खिडकीजवळ बसलेल्या एका मुलीवर त्याची नजर पडली. १३ वर्षीय ही मुलगी शाळेच्या गणवेषात होती. तिला पहिल्याच नजरेत पाहून जॅकीदादा क्लीन बोल्ड झाला होता. त्यामुळेच क्षणाचाही विलंब न लावता जॅकीदादा बसमध्ये पोहचला. बसमध्ये जाताच जॅकीदादा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करु लागला आणि त्यात त्याला यशसुद्धा आलं. पहिल्या नजरेतलं हे प्रेम हळूहळू खुलू लागलं. दोघांची आधी मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमाचे हे अंकुर आता १३ वर्षीय आयेशाच्या मनातही फुलू लागले. मात्र जे सर्व लव्ह स्टोरीत होते तेच जॅकी-आयेशाच्या लव्ह स्टोरीतही झाले.
आयेशा एका श्रीमंत कुटुंबातून होती. मात्र दोघांच्या प्रेमात पैशांपेक्षा एक मोठी आणि वेगळीच अडचण होती. जॅकीचे आयेशा आधी एका मुलीवर प्रेम होते. जॅकीची गर्लफ्रेंड अमेरिकेत होती आणि ती भारतात परतल्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकणार होते. त्यामुळे आधीच्या गर्लफ्रेंडशी लग्न करावे की आयेशाशी असा पेच जॅकीला पडला. मात्र या सगळ्या गोष्टीत आयेशानेच खंबीरपणा दाखवत पुढाकार घेतला. तिने अमेरिकेत असणा-या जॅकीच्या गर्लफ्रेंडला पत्र लिहून सारं काही सांगून टाकले. गर्भश्रीमंत घरात वाढलेली आयेशा जॅकीशी लग्न झाल्यानंतर चाळीतही राहिली आहे. आयेशा जीवनात आल्यानंतर सारं काही बदललं असं जॅकीदादा अभिमानाने सांगतो. आपल्या यशाचे सगळे श्रेय तो तिलाच देतो.