बोमन इराणी हे नाव हिंदी सिनेमांच्या प्रेक्षकांसाठी अपरिचित नाही. मुन्नाभाई एमबीबीएस, थ्री इडियट्स, शीरिन फरीदी की तो निकल पडी अशा अनेक चित्रपटातून आपली छाप पाडणारे बोमन इराणी यांचा आज वाढदिवस. 2 डिसेंबर 1959 रोजी मुंबईत जन्मलेले बोमन आज एक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत. पण त्यांची रिअल लाईफ स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी रंजक नाही.
होय, बोमन यांनी वयाच्या 42 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्याआधी हॉटेलमध्ये वेटर ते रस्त्यावर फोटो विकण्याचे कामही त्यांनी केले.
अभिनय क्षेत्रात येण्याआधी बोमन मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये वेटर आणि रुम सर्व्हिस बॉयचे काम करत असत. दोन वर्षे त्यांनी हे काम केले.
यानंतर काही कौटुंबिक कारणाने त्यांनी वेटरची ही नोकरी सोडली व कुटुंबाच्या व्यवसाय सांभाळणे सुरु केले. पण या व्यवसायात फार काळ त्यांचे मन रमले नाही.
लहानपणापासूनच बोमन यांना अॅक्टिंग व फोटोग्राफीची आवड होती. 1987 मध्ये त्यांनी फोटोग्राफी सुरु केली. सुरुवातीच्या काळात रस्त्यावर 25 रूपयांत त्यांनी फोटो विकले.
याच काळात त्यांनी हंसराज सिधियाच्या मार्गदर्शनाखाली स्टेज अॅक्टिंग शिकली. सन २००० सालापासून त्यांनी पूर्णवेळ अभिनय करण्याचा निर्णय घेतला. फारसा प्रसिद्ध अभिनेता नसतानाही विधू विनोद चोप्राने त्यांना‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ची पटकथा पूर्ण होण्याआधीच दोन लाख रुपये मानधनासह कास्ट केले होते.