कोरोनाचा फास दिवसेंदिवस आवळत असताना अलीकडे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या लोखंडवालास्थित ग्रीन एकर्समधील घरात काम करणारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. ही व्यक्ती म्हणजे बोनी कपूर यांच्याकडे काम करणारा एक घरगडी. यानंतर बोनी कपूर यांच्या घरी काम करणारे आणखी दोन नोकर कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. आता बोनी यांनी ट्विट करून जान्हवी व खूशीच्या कोरोना रिपोर्टबद्दल सांगितले आहे.
‘मला हे सांगताना आनंद होतोय की माझ्या दोन्ही मुली व माझी कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. आमच्या स्टाफमधील तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर त्यांची प्रकृतीही बरी आहे. स्टाफमधील तिघे कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर आम्हा तिघांना 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितले गेले होते. या 14 दिवसांत आम्ही नियमांचे काटेकोर पालन केले. आता कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याने आम्ही सगळे आनंदी आहोत. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्यास सज्ज आहोत,’ असे बोनी कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. या ट्विटमध्ये बोनी कपूर यांनी बीएमसी आणि मुंबई पोलिसांनाही टॅग केले आहे.
जान्हवी कपूर लवकरच गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याशिवाय रूही अफजाना आणि दोस्ताना 2मध्येही तिची वर्णी लागली आहे. गुंजन सक्सेना व रूही अफजाना या दोन्ही सिनेमांचे शूटींग जान्हवीने पूर्ण केले आहे.आता हे दोन्ही सिनेमे कधी रिलीज होतात, याची प्रतीक्षा आहे.