अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा ‘मिस्टर इंडिया’ या सुपरडुपर हिट चित्रपटाला कोण बरे विसरू शकणार? ‘मिस्टर इंडिया’ला 32 वर्षे पूर्ण झालीत. पण आजही या चित्रपटाच्या आठवणी, यातील श्रीदेवी सगळे काही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. दीर्घकाळापासून ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल येणार, अशी चर्चा सुरु आहे. साहजिकच हा सीक्वल कधी येणार, कसा असणार, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तर आता या प्रश्नांचीही उत्तरे मिळाली आहेत. खुद्द बोनी कपूर यांनी एका ताज्या मुलाखतीत या प्रश्नांची उत्तरे दिली.
मिड डेशी बोलताना बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल येणार, यावर शिक्कामोर्तब केले. आधी या चित्रपटाचा रीबूट बनवण्याची योजना आहे. नंतर याच्या फ्रेंचाइजीवर काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. आमच्याकडे या सीक्वलचा बेसिक स्ट्रक्चर तयार आहे. पण यावर काम कधी सुरु होणार, हे अद्याप ठरलेले नाही. पण हे काम लवकरच सुरु होईल, एवढेच मी सांगेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या चित्रपटाबद्दलच्या अनेक आठवणीही त्यांनी सांगितल्या.
1980 मध्ये या चित्रपटाचा बजेट 4 कोटी होता. त्याकाळात हा बजेट खूप मोठा होता. यासाठी वर्सोवा येथे एक सेट उभारण्यात आला होता. यात अमरीश पुरी यांनी मोगॅम्बोचे आयकॉनिक रोल साकारला होता आणि श्रीदेवीही एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आली होती. या चित्रपटानंतर श्रीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. ती एक पॉवरफुल अभिनेत्री बनली. श्रीच्या निधनानंतर या चित्रपटाचा सीक्वल बनण्याची अनेक कारणे माझ्याकडे आहेत, असेही बोनी कपूर यांनी यावेळी सांगितले. ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वलही शेखर कपूर दिग्दर्शित करणार का? असे विचारले असता, ते बिझी नसतील तर नक्कीच, असे बोनी कपूर म्हणाले.
‘मिस्टर इंडिया’ला 32 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अनिल कपूर यांनी एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी वीरू देवगण यांना श्रद्धांजली वाहिली होती.