Join us

राजस्थानच्या ट्रान्सजेंडर बोनिताला लागली लॉटरी; LSD 2 मध्ये साकारणार लीड रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 11:33 IST

Bonita Rajpurohit: पहिल्यांदाच एक ट्रान्सवूमन सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकता कपूरच्या 'लव्ह सेक्स धोखा 2' ची (LSD2) जोरदार चर्चा रंगली आहे. या सिनेमाचा पहिला भाग प्रचंड गाजला होता. त्यामुळे या नव्या भागात नेमकं काय पाहायला मिळेल याची नेटकऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. यामध्येच या सिनेमामधील एक-एका भूमिकेवरील पडदा दूर होत आहे. विशेष म्हणजे एकताने तिच्या या सिनेमामध्ये बोनिता राजपुरोहित (Bonita Rajpurohit) या ट्रान्सजेंडर वूमनला काम करायची संधी दिली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर बोनिताविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, एक ट्रान्सजेंडर ते लीड रोल साकारणारी अभिनेत्री असा टप्पा गाठणाऱ्या बोनिताचा हा प्रवास सोपा नव्हता.

बोनिता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून तिचा चाहतावर्गदेखील बराच आहे. परंतु, एक काळ असा होता ज्यावेळी तिने अनेक रात्री रेल्वे स्टेशनवर उपाशीपोटी झोपून काढल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक संकटं, चढउतार, संघर्ष करुन बोनिताने स्वत:ला सिद्ध केलं आहे. ती केवळ अभिनेत्रीच नाही तर ती मिस ट्रान्स 2019 ची सेकंड रनरअप सुद्धा राहिली आहे. त्यामुळे तिच्या या संघर्षमयी प्रवासाविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

नेमकं कोण आहे बोनिता राजपुरोहित?

Bonita Rajpurohit ही मूळची राजस्थानची. राजस्थानमधील एका लहानशा गावात तिचा जन्म झाला. लहानपणापासून बोनिताला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं आणि तिचं हेच स्वप्न तिला मुंबईपर्यंत घेऊन आलं. मात्र, मुंबईत आल्यावर तिचा खरा स्ट्रगल सुरु झाला. सुरुवातीला बोनिता एका प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत होती. या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करण्याचे तिला १०-१५ हजार रुपये मिळायचे.पण, तिने तिचे प्रयत्न सुरु ठेवले आणि पडद्यामागे काम करणारी बोनिता आज पडद्यावर झळकणार आहे.

LSD 2मध्ये कोणत्या भूमिकेत दिसणार बोनिता?

एकता कपूरच्या या सिनेमामध्ये बोनिता लीड भूमिका साकारत आहे. या सिनेमामधील कुलू ही मुख्य भूमिका तिच्या पदरात पडली आहे. या भूमिकेच्या माध्यमातून ती ट्रान्सजेंडर समाजाला कोणकोणत्या सामाजिक वा अन्य समस्यांचा सामना करावा लागतो हे ती सांगणार आहे.

दरम्यान, बोनिता सोशल मीडियावर सक्रीय असून ती अनेक ब्रँडसाठी फोटोशूटही करते.  तसंच ती मॉडलिंग क्षेत्रातही सक्रीय आहे. बोनिताची मुख्य भूमिका असलेली LSD 2 हा सिनेमा येत्या १९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाएकता कपूर