ठळक मुद्देअजय देवगणच्या करियर मधील ‘तान्हाजी’ हा शंभरावा चित्रपट असून त्यापासून अजयला व त्याच्या चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या.
अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ने बॉक्स ऑफिसवर कमाल केलीय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बंपर कमाई करत, सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘तान्हाजी’ सोबत दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ आणि रजनीकांतचा ‘दरबार’ रिलीज झाला होता. परंतु या दोन्ही चित्रपटांना धोबीपछाड देत ‘तान्हाजी’ने बॉक्स ऑफिसवरचे वर्चस्व कायम राखले. पहिल्या चार दिवसांत या सिनेमाने 75.68 कोटींचा गल्ला जमवला. शिवाय अनेक विक्रमांवर आपले नावही कोरले.
तिस-या दिवशी या चित्रपटाने या 6 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला. तिस-या दिवशी ‘तान्हाजी’चे सकाळचे शो 65.01 टक्के फुल दिसले. गत वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘हाउसफुल 4’ ला तिस-या दिवशी 27 टक्के ओपनिंग मिळाली होती तर ‘वॉर’ला 30 टक्के, ‘दबंग ३’ला 40 टक्के, ‘भारत’ला 42 टक्के, ‘गुड न्यूज’ला 45.58 टक्के आणि ‘मिशन मंगल’ तिस-या दिवशी 58 टक्के ओपनिंग मिळाली होती.‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ने भारतामध्ये पहिल्या दोन दिवसातच 35.67 कोटी रुपयांची कमाई केली. एवढेच नव्हे तर पहिल्याच दिवसात या चित्रपटाने 15.10 कोटी रुपये गल्ला जमवला होता. त्यानंतर दुस-या दिवशी या चित्रपटाने तब्बल 20.57 कोटी कमावले. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला असून सगळीकडे हा चित्रपट चांगले नाव कमवत आहे.
अजय देवगणच्या करियर मधील ‘तान्हाजी’ हा शंभरावा चित्रपट असून त्यापासून अजयला व त्याच्या चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. चित्रपट प्रदर्शनानंतर एका आठवड्याच्या आतच हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला. हा चित्रपट बनवण्यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च आला होता. त्यामुळे आता हा खर्च भरून काढण्यासाठी तानाजी चित्रपटाला 200 कोटींचा आकडा पार करण्याची आवश्यकता आहे.