Join us

BOX OFFICE : ‘या’ कारणामुळे ‘वीरे दी वेडिंग’च्या कमाईला लागणार ब्रेक; सहा दिवसांत कमाविले इतके कोटी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 11:21 AM

सोनम कपूर, करिना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. परंतु आता या कारणामुळे त्यास ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

अभिनेत्री करिना कपूर, सोनम कपूर स्टारर ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा झाला असून, चित्रपटाचा बॉक्स आॅफिसवरील कमाईचा जोर कायम आहे. चित्रपटाने केवळ सहाच दिवसांमध्ये ५० कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. ४० ते ४५ कोटी रुपयांमध्ये बनविण्यात आलेल्या या चित्रपटाने केवळ सहाच दिवसांमध्ये निर्मितीचा खर्च वसूल केला आहे. पुढील काही दिवसांमध्ये कमाईचा जोर असाच कायम राहिल्यास चित्रपट सुपरहिट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या आठवड्यात सुपरस्टार रजनीकांत स्टारर ‘काला’ आणि ‘ज्युरासिक वर्ल्ड’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने ‘वीरे दी वेडिंग’ किती कोटींपर्यंत मजल मारणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, बुधवारी ‘वीरे दी वेडिंग’ने ४.८७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कमाईचा विचार केल्यास ओपनिंग डेला १०.७० कोटी, शनिवारी १२.२५ कोटी, रविवारी १३.५७ कोटी, सोमवारी ६.०४ कोटी आणि मंगळवारी ५.४७ कोटी रुपयांचा बिझनेस केला. जबरदस्त बोल्ड कंटेंट असलेल्या या चित्रपटाने केवळ ६ दिवसांतच ५२.९० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.  तरण आदर्श यांच्या मते, रजनीकांत स्टारर ‘काला’ आणि हॉलिवूड चित्रपट ‘ज्युरासिक वर्ल्ड’मुळे ‘वीरे दी वेडिंग’च्या कमाईला ब्रेक लागू शकतो. दरम्यान, रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला ‘काला’ आज (गुरुवारी) प्रदर्शित करण्यात आला आहे. तर ‘ज्युरासिक वर्ल्ड’ शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, ‘वीरे दी वेडिंग’ची कथा अशा चार मुलींवर आधारित आहे, ज्या बिनधास्त आयुष्य जगणे पसंत करतात. चित्रपटात पहिल्यांदाच करिना आणि सोनमची जोडी बघावयास मिळत आहे. त्याचबरोबर स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया आणि सुमित व्यास यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘वीरे दी वेडिंग’च्या माध्यमातून करिना तब्बल दोन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करीत आहे. मुलगा तैमूर अली खानच्या जन्मानंतर करिनाचा हा पहिलाच चित्रपट आहे.