उष्णतेच्या लाटेत थंडावले बॉक्स ऑफिस! मराठी चित्रपटांची चलती; 'लो' बजेट हिंदी सिनेमांचे कौतुक
By संजय घावरे | Published: April 30, 2024 07:38 PM2024-04-30T19:38:29+5:302024-04-30T19:41:12+5:30
यंदा वर्षातील चार महिने संपले तरीही हिंदी सिनेसृष्टीला अद्याप सूर गवसलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: यंदाचे चार महिने संपले तरी हिंदी सिनेसृष्टीला अद्याप सूर गवसलेला नाही. आजही २१३ कोटी रुपये कमावणारा 'फायटर' अव्वलस्थानी आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात बॉक्स ऑफिस थंडावले आहे. मागच्या आठवड्यापासून पुन्हा एकदा मराठी चित्रपट चांगला गल्ला जमवू लागले असून, प्रकाशझोतात नसलेले काही लो बजेट हिंदी चित्रपट कौतुकाची मिळवत आहेत.
यंदा प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांमध्ये 'फायटर' मागोमाग 'शैतान', 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया', 'आर्टिकल ३७०', 'क्रू' हे चित्रपट पहिल्या पाच चित्रपटांच्या पंक्तीत विराजमान आहेत, पण 'फायटर' वगळता एकालाही बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा गल्ला जमवता आलेला नाही. मराठी चित्रपटांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. 'ओले आले', 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' आणि 'शिवरायांचा छावा' या चित्रपटांनी बऱ्यापैकी व्यवसाय केला आहे, पण मराठीलाही सुपरहिट चित्रपट मिळालेला नाही. मागच्या आठवड्यात रिलीज झालेला महेश मांजरेकरांचा 'जुनं फर्निचर' पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत असल्याने या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत. स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला 'नाच गं घुमा' आणि 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हे दोन वेगळ्या विषयांवरील चित्रपट रिलीज झाले आहेत. 'नाच गं घुमा'चे दिग्दर्शन परेश मोकाशीने केले असल्याने आणि 'स्वरगंधर्व' सुधीर फडकेंवर आधारित असल्याने दोन्ही चित्रपटांकडून अपेक्षा आहेत.
मागच्या आठवड्यात रिलीज झालेल्या 'रुसलान' आणि 'रझाकार' यांची हवा होती, पण अनपेक्षितपणे 'मैं लडेगा' हा लो बजेट सिनेमा भाव खाऊन गेला. संजय लीला भन्साळींच्या 'हिरामंडी'ची उत्सुकता आहे, पण हि वेब सिरीज आहे. येत्या शुक्रवारी नवोदितांचा समावेश असलेला दिग्दर्शक दानिश जावेद यांचा 'प्यार के दो नाम' हा एकमेव हिंदी चित्रपट रिलीज होणार आहे. याचा फायदा नुकत्याच रिलीज झालेल्या दोन्ही मराठी चित्रपटांसोबत 'जुनं फर्निचर'ला होऊ शकतो. पुढल्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या राजकुमार रावच्या 'श्रीकांत'बाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटासोबत 'हॉरोस्कोप' हा इंग्रजी आणि दीपक तिजोरी दिग्दर्शित हिंदी 'टिप्सी' रिलीज होणार आहे. १७ मे रोजी पुन्हा श्रेयस तळपदेचा 'कर्तम भुगतम' हा एकच चित्रपट रिलीज होईल. त्या नंतरच्या आठवड्यात मनोज बाजपेयीच्या 'भैया जी'सोबत 'द हेस्ट' आणि 'द गारफिल्ड मुव्ही' हा इंग्रजी अॅनिमेशनपट येईल. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा राजकुमार रावचा 'मि. अँड मिसेस माही' प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या स्पोर्टस ड्रामामध्ये राजकुमारसोबत जान्हवी कपूर दिसेल. याच दिवशी 'छोटा भीम अँड द कर्स ऑफ दमयान' हा बच्चे कंपनींचा सिनेमा येईल.
सध्या चहूबाजूला निवडणूकीचे वातावरण असून, काही भागांमध्ये उष्णतेचे प्रमाण खूप वाढले असल्याने या काळात सिनेमागृहांमधील प्रेक्षकांची संख्या रोडावते असे चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा वातावरणात निर्माते मोठे चित्रपट प्रदर्शित करण्याची रिस्क घेत नाहीत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये बरेच जण गावी, थंड हवेच्या ठिकाणी, तसेच परदेशात सुट्ट्या एन्जॉय करण्याला प्राधान्य देत असल्याचा फॅक्टरही कारणीभूत आहे. योग्य नियोजन, प्रमोशन आणि वितरण केल्यास मोठे हिंदी चित्रपट रिलीज होत नसल्याचा फायदा मराठी चित्रपटांना घेता येऊ शकतो.