सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांचा बहुप्रतिक्षीत ठरलेला 'बंटी और बबली 2' (Bunty Aur Babli 2) हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'बंटी और बबली' या चित्रपटाच्या सीक्वलकडून चित्रपट दिग्दर्शक आणि एकंदरीत संपूर्ण टीमची मोठी अपेक्षा होती. हा चित्रपट सुपरहिट ठरण्यासोबतच बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करेल असा समज फिल्ममेकर्सचा होता. मात्र, प्रत्यक्षात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची मनं जिंकण्यास अपयशी ठरला आहे. १९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तिसऱ्या दिवशीही फारशी कमाई न केल्याचं दिसून येत आहे.
चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटवर एक पोस्ट शेअर करत Bunty Aur Babli 2 च्या कमाईची आकडेवारी शेअर केली आहे. त्यानुसार, या चित्रपटाने आतापर्यंत किरकोळ कमाई केल्याचं दिसून येत आहे. सोबतच सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत या चित्रपटाने तीन दिवसात केवळ ८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Bunty Aur Babli 2 च्या कमाईची आकडेवारी
पहिल्या दिवशी या चित्रपटाने २.६० कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशीदेखील या चित्रपटाने २.५० कोटी रुपयांचाच गल्ला जमवला. तर रविवारी केवळ ३.२० कोटी रुपयांचा बिझनेस झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाने केवळ ८.३० कोटी रुपयांची कमाई केल्याचं सांगण्यात येते.
या चित्रपटाकडून निर्मात्यांसोबतच प्रेक्षकांच्याही प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, हा चित्रपट अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे जगभरातील जवळपास २५०० स्क्रीनवर हा चित्रपट रिलीज झाला होता.
दरम्यान, Bunty Aur Babli 2 हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या Bunty Aur Babliचा सिक्वल आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी झळकले होते. या चित्रपटाने २००५ मध्ये जवळपास ६३.३४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर बंटी Bunty Aur Babli 2 मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ झळकले आहेत.