Join us

BOX OFFICE : ‘बागी-२’च्या दमदार ओपनिंगनंतरही ‘रेड’ आणि ‘हिचकी’चा जोर कायम, कमाविले इतके कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2018 1:03 PM

‘बागी-२’ प्रदर्शित होताच अभिनेता टायगर श्रॉफच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण ओपनिंगलाच ‘बागी-२’ने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’चा विक्रम ...

‘बागी-२’ प्रदर्शित होताच अभिनेता टायगर श्रॉफच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण ओपनिंगलाच ‘बागी-२’ने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’चा विक्रम ब्रेक केला असून, वीकेण्डमध्येच चित्रपट शंभर कोटी क्लबपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अजय देवगणचा ‘रेड’ आणि त्यानंतर प्रदर्शित झालेल्या राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’चा बॉक्स आॅफिसवरील जोर कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दोन्ही चित्रपटांचा कमाईचा सिलसिला कायम असून, अजयचा ‘रेड’ लवकरच शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविण्याची शक्यता आहे. राणीच्या ‘हिचकी’ने आतापर्यंत ३१.१० कोटी तर अजय देवगणच्या ‘रेड’ने आतापर्यंत ९४.१९ कोटींची बॉक्स आॅफिसवर लयलूट केली आहे. शुक्रवार आणि शनिवारच्या कलेक्शनविषयी सांगायचे झाल्यास, ‘बागी-२’च्या प्रदर्शनानंतरही या दोन चित्रपटांच्या कमाईवर फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून येते. कारण ‘हिचकी’ने शुक्रवारी २.४० कोटी आणि शनिवारी २.६० कोटी रुपयांचा गल्ला जमविला. तर अजयच्या ‘रेड’ने शुक्रवारी १.८२ कोटी आणि शनिवारी २.२६ कोटी रुपयांची कमाई केली. या कमाईबरोबर अजयचा रेड शंभर कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होण्यासाठी केवळ काही पावलेच दूर आहे.  दरम्यान, ‘हिचकी’चे एकूण बजेट २० कोटी असल्याने या चित्रपटाने अगोदरच हिट चित्रपटांच्या यादीत स्थान मिळविले आहे. तर ‘रेड’चे बजेट ५५ कोटी रुपये असून, त्यालाही सुपरहिट चित्रपटांच्या यादीत स्थान मिळाले आहे. दरम्यान, ‘बागी-२’बद्दल सांगायचे झाल्यास पहिल्याच दिवशी २५ कोटी रुपयांची कमाई करून या चित्रपटाने आपला जोर दाखवून दिला आहे. वादग्रस्त ‘पद्मावत’ला १९ कोटी रुपयांची ओपनिंग मिळाली होती. अशात यावर्षी सर्वात जास्त ओपनिंग मिळालेला ‘बागी-२’ हा चित्रपट ठरला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट या वीकेण्डला ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. टायगरचा हा चित्रपट देशभरात ३५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला. विदेशात या चित्रपटाला ६२५ स्क्रिन्स मिळाले. इटली, म्यानमारसह ४५ देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.