यूपीच्या लखीमपूर खीरीतील एका सिनेमा हॉलमध्ये धक्कादायक घटना घडली. 'गदर 2' (Gadar 2) बघायला गेलेल्या युवकाला सिनेमा हॉलमध्ये येताच हृदयविकाराचा धक्का आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अष्टक तिवारी असं त्याचं नाव होतं. वयाच्या केवळ ३२ व्या वर्षी त्याचं निधन झालं.
अष्टक तिवारी लखीमपूर खिरी भागातील कोतवालीच्या द्वारकापुरीचा राहणारा होता. फोनवर बोलत तो जसा सिनेमा हॉलच्या गेटवर पोहोचला, तिथेच त्याचा हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली पडला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला लगेच उचललं. सुरक्षारक्षकांनी त्याचा मोबाईल घेऊन त्याच्या घरी फोन लावला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे आणि ट्विटरवर याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ट्वीटर युझर संजय त्रिपाठी यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस तपास करत आहेत. सिनेमा बघायला गेलेल्या युवकासाठी तो दिवस शेवटचा दिवस ठरला. सिनेमा बघायला जातो सांगून गेला तो परतलाच नाही असं म्हणत कुटंबीयांनी दु:ख व्यक्त केलं आहे.