देश आणि जगाशी निगडित प्रश्नांवर आवाज न उठवल्याचा आरोप अनेकदा चित्रपट कलाकारांवर होत असतो. अलिकडेच इस्रायलने रफाहवर एअर स्ट्राइक केला. त्यात अनेक निष्पाप, निपराध नागरिक लहान मुलं, महिला यांना आपले प्राण गमवावे लागले. गाझामधील रफाह शहरावर इस्रायलच्या गोळीबार आणि हवाई हल्ल्यांच्या विरोधात बॉलिवूड कलाकारांनी आवाज उठवला. बॉलिवूडसेलिब्रिटींनी आपल्या सोशल मीडियावर ‘ऑल आइज ऑन रफाह’ नावाने पोस्ट शेअर केली. पण, यातच सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड असा ट्रेंड सुरू झाला आहे.
सध्या संपूर्ण बॉलिवूडवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होत आहे. पण, याला कारण कोणता सिनेमा नाही तर बॉलिवूडकरांनी 'ऑल आइज ऑन रफाह' पोस्ट शेअर केल्याने होत आहे. अनेक स्टार्सनी रफाह शहरावर हल्ल्याविरोधात सोशल मीडियावर 'ऑल आइज ऑन रफाह' अशा पोस्ट केल्या. एकट्या इन्स्टाग्रामवर हे चित्र तब्बल ३४ लाखपेक्षा जास्त वेळा शेअर करण्यात आलं आहे. त्यात दिया मिर्झा, करीना कपूर खान, आलिया भट्ट, वरुण धवन, तृप्ती डिमरी, समांथा प्रभू, फातिमा सना शेख आणि स्वरा भास्कर सारख्या कलाकारांचा समावेश आहे.
बॉलिवूडकरांनी 'ऑल आइज ऑन रफाह' पोस्ट केल्यानंतर भारतातील इस्रायली दूतावासानेही यावर प्रतिक्रिया दिली. जेव्हा हमासने 125 इस्रायली पुरुष, महिला, मुले आणि वृद्धांना ठार केलं. तेव्हा तुमचे डोळे कुठे होते? असा प्रतिप्रश्न केलाय. तसेच संपुर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतरच मतं मांडावं, असं इस्रायली दूतावासानं म्हटलं. इस्रायली दुतवासाच्या या पोस्टनंतर 'कलाकार हे एकतर्फी मत मांडत आहेत. त्यांना संपूर्ण प्रकरणाची जाणीव असायला हवी', असं म्हणत नेटकऱ्यांनी सेलिब्रेटिंना सोशल मीडियावर ट्रोल केलं.
यासोबतच काश्मीरमधील पंडितांविरोधात जेव्हा हिंसा उफाळली होती, तेव्हा बॉलिवूड कलाकारांनी कुठलीही भुमिका घेतली नव्हती, यावरुन नेटकऱ्यांनी टीका केली. सोशल मीडियावर सध्या 'ऑल आइज ऑन रफाह' ऐवजी 'ऑल आयज ऑन पीओके' आणि 'बॉयकॉट बॉलिवूड' असा ट्रेंड सुरू झाला आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही पोस्टचा किती व्यापक प्रभाव पडतो आणि एक पोस्ट देशभरात चर्चेचा विषय कशी बनू शकते, हे या घटनेने दाखवून दिले.