अभिनेता सैफ अली खान अनेकवेळा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असतो. आता तो पुन्हा एकदा त्याच्या विधानामुळे चर्चेत आला आहे. दिग्दर्शक ओम राऊत याच्या आगामी बिग बजेट 'आदिपुरुष' या चित्रपटामध्ये तो रावणाची भूमिका साकारणार आहे. याबद्दल मुलाखत देताना सैफ अली खान म्हणाला की, " रावण हा खलनायक नव्हता.". त्याच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले आहे. तसेच, त्याने पुढे म्हटले की, 'या चित्रपटात रावणाची मानवीय बाजू दाखवण्यात येणार आहे.' त्यामुळे आता चित्रपटावर बंदी घालण्याचीदेखील मागणी करण्यात येत आहे. #BoycottAdipurush हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होताना दिसतो आहे.
'आदिपुरुष' या चित्रपटामध्ये सैफ अली खान 'लंकेश' म्हणजे रावणाची भूमिका साकारणार आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने म्हटले की 'रावणाला आजवर आपण केवळ खलनायच्या भूमिकेत पाहिले. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रावण माणूस म्हणून कसा होता? याचं चित्रण आदिपुरुषमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
रावणाने भगवान श्री राम यांच्यासोबत युद्ध केले हे सर्वांनाच माहित आहे. पण त्याला देखील एक पार्श्वभूमी होती. रामाचे भाऊ लक्ष्मण यांनी शुर्पनखेचे नाक कापले होते. त्यानंतर हे युद्ध होणारच होते. या चित्रपटात रावणची विचारसरणी काय होती हे दाखवले जाणार आहे.'
आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचे दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.