Janhvi Kapoor Peacock Dress : जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकतंच तिनं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात बॉयफ्रेंड शिखर पहाडियासह हजेरी लावली. यावेळी जान्हवी कपूरने परिधान केलेल्या ड्रेसनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र ऐन पार्टीत जान्हवीला तिचा हा सुंदर ड्रेस फाडावा लागला. याबद्दल एक पोस्ट शेअर करत जान्हवीनं सांगितलं आहे.
जान्हवी कपूर हिनं मनिष मल्होत्राने डिझाइन केलेला हिरव्या-निळ्या रंगाचा पिकॉक लेहेंगा ड्रेस परिधान केला होता. मोरपिशी रंगाच्या ड्रेसवर मोरपिस डिझाईन दिसून आलं. हा ड्रेस तयार करण्यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली होती. पण, या ड्रेसमध्ये असलेल्या कॅन-कॅनमुळे तिला डान्स करण्यात अडचण येत होती. त्यामुळे जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखरने स्वत: कात्री हातात घेतली आणि लेहेंग्याचा कॅन-कॅन हा हिस्सा कापून टाकला.
जान्हवीने काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यासोबतच तिनं या पिकॉक लेहेंग्याचं महत्त्व सांगितलं. हा लेहेंगा जामनगरमधील निसर्गसौंदर्य आणि वन्यजीवनापासून प्रेरणा घेऊन खास तिच्यासाठी बनवला असल्याचं जान्हवीनं पोस्टमधून सांगितलं आहे.
जान्हवीनं लांबलचक कॅप्शन देत तिनं लिहलं, 'या लग्न सोहळ्यातील अखेरच्या कार्यक्रमात मला अर्थपुर्ण ड्रेस परिधान करण्याची इच्छा होती. जामनगरमध्ये माझ्या बऱ्याच खास आठवणी आहेत. निसर्ग, सौंदर्य आणि वन्यजीवांनी वेढलेल्या जामनगरमध्ये काही सुंदर गोष्टी आहेत, ज्याची मला मनापासून काळजी आहे. म्हणून आम्ही तेथून प्रेरणा घेण्याचं ठरवलं. जामनगरमध्ये जर तुम्ही नजर फिरवालं तर तुम्हाला एक, दोन किंवा तीन कधी-कधी तर 10 मोर दिसतील'
पुढे तिनं लिहलं, 'हे मोर लॉनमध्ये येतात, त्याची सुंदर अशी मोरपीसे सोडतात आणि कधी तर तुमचा नाश्ताही खातात. म्हणून मोराच्या रंगाचा लेहेंगा बनवण्याचं ठरवलं. अखेर मनिष मल्होत्रा आणि त्यान टीमने एक सुंदर असा पिकॉक लेहेंगा बनवला. हा ड्रेस पाहिल्यानंतर मी अवा्क झाले. यासाठी मी खूप आभारी आहे. पण, शेवटी डान्ससाठी मला लेहेंग्यामधील कॅन-कॅन हा हिस्सा कापावा लागला, यासाठी मला माफ करा'.