प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बी आर चोप्रा (BR Chopra) यांचा मुंबईतील जुहू येथील बंगला विकण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याचा बंगला २५ हजार स्क्वेअर फूट परिसरात पसरलेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा बंगला सुमारे १८३ कोटी रुपयांना विकला गेला आहे. बीआर चोप्रा यांचा हा आलिशान बंगला गृहनिर्माण प्रकल्प बनवण्यासाठी खरेदी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा बंगला एक एकर जागेवर पसरलेला आहे. २५ हजार स्वेअर फूट एवढी प्रशस्त जागा असणारे हे घर आता पाडले जाणार आहे. या ठिकाणी एक मोठी रेसिडेन्शिअल इमारत उभी करण्याचा व्यावसायिकाचा प्रस्ताव आहे. हा बंगला जुहू तारा रोड येथील एका मोक्याच्या ठिकाणावर असल्याने इथल्या जागेचे भाव ६० ते ६५ हजार रुपये प्रति स्वेअर फूट आहेत.
बी आर चोप्रा यांनी याच बंगल्यात २००८ साली शेवटचा श्वास घेतला. मात्र त्यापूर्वी त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्यांच्या प्रोडक्शन हाऊसवर खूप कर्ज झालं होतं. त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांची कंपनी तोट्यात सुरू होती. बी आर चोप्रा यांनी या घरावर अनेक कर्ज देखील घेतले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने २०१३ सालापर्यंत सर्व कर्ज फेडून हा बंगला परत मिळवला होता.