Brahmastra box office collection: गेल्या काही दिवसांपासून ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. रणबीर कपूर व आलिया भटचा हा सिनेमा रिलीज झाला तोच ‘बायकॉट बॉलिवूड’ या ट्रेंडच्या सावटाखाली. चित्रपटाला बायकॉट करण्याची मागणी केली केली, अनेक नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या, रणबीर-आलियावर जबदस्त टीका झाली. पण याऊपरही हा सिनेमा गर्दी खेचण्यात यशस्वी झाला. 9 सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शित झाला आणि लोकांनी या सिनेमाला अक्षरश: डोक्यावर घेतलं. पहिल्या तीनच दिवसांत 100 कोटी वसूल करून या चित्रपटाने 6 विक्रमांवर नाव कोरलं. या चित्रपटाने ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटालाही मागे टाकलं.
‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्या तीन दिवसांत 124 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. हा आकडा फक्त भारतातला आहे. वर्ल्डवाईड कमाईबद्दल सांगायचं तर तीन दिवसांत या चित्रपटाने 225 कोटींचा गल्ला जमवला आहे. पण खरी टेस्ट ‘मंडे टेस्ट’ होती. होय, रिलीजच्या पहिल्या सोमवारी सिनेमा किती कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. रविवारी 45 कोटी कमावणारा ‘ब्रह्मास्त्र’ मंडे टेस्टमध्ये पास होतो की फेल, हे जाणून घेण्यास सगळेच उत्सुक होते. तर मंडे टेस्टचे आकडे आले आहेत.तर ‘ब्रह्मास्त्र’ने मंडे टेस्टही चांगल्या गुणांनी पास केली आहे. आकडेवारीनुसार, ‘ब्रह्मास्त्र’च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या सोमवारी 15.10 कोटींची कमाई केली. सर्व भाषेतील कमाईचा भारतीय बॉक्स ऑफिसवरचा आकडा 16.50 कोटींचा आहे. याचसोबत ‘ब्रह्मास्त्र’ने ‘द काश्मीर फाइल्स’चा रेकॉर्ड मोडला.
‘द काश्मीर फाइल्स’चा रेकॉर्ड मोडलाविवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने रिलीजनंतरच्या पहिल्या सोमवारी 15.05 कोटींचा बिझनेस केला होता. गेल्या सहा महिन्यांपासून ‘द काश्मीर फाइल्स’चा हा रेकॉर्ड कोणत्याही चित्रपटाला मोडला आला नव्हता. मात्र ‘ब्रह्मास्त्र’ने अखेर हा रेकॉर्ड मोडलाच.
रणबीरने मोडला त्याचाच रेकॉर्ड रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’ पहिल्या वीकेंडमध्ये दमदार कमाई करत स्वत:च्याच चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला. याआधी ‘संजू’ हा रणबीरचा पहिल्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये 120.06 कोटींची कमाई केली होती. ‘ब्रह्मास्त्र’ने अवघ्या तीन दिवसांत 125 कोटी कमवत ‘संजू’चा रेकॉर्ड मोडला.