ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुलाबा येथील चर्चमध्ये शोकसभा ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. विशेष म्हणजे प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करता करता त्यांनी खलनायिका म्हणून वेगळीच छाप पाडली. सोलापुरातल्या एका सधन कुटुंबात जन्म झालेल्या शशिकला यांचं बालपण ऐशोआरामात गेलं. बालपणापासूनच त्यांना नृत्याची आणि अभिनयाची आवड होती. शशिकला जवळकर लग्नानंतर शशिला ओमप्रकाश सैगल बनल्या.
१९४७च्या जुगनू चित्रपटात दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका शशिकला यांनी साकारली. मात्र यानंतर काम मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. १९६२ साली आरती चित्रपटात निगेटिव्ह भूमिका शशिकला यांना मिळाली. या भूमिकेमुळे शशिकला यांनी पुढे कधीच चित्रपटात काम न करण्याचे ठरवले. मात्र चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी शशिकला यांची समजूत काढून या भूमिकेसाठी तयार केले. आरती चित्रपटातील या खलनायिकेच्या भूमिकेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. फिल्मफेअरसारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. हरियाली और रास्ता, गुमराह, हमराही, फुल और पत्थर अशा चित्रपटात खलनायिकेच्या भूमिका त्यांनी साकारल्या. ओम प्रकाश मेहरा यांच्यासोबत शशिकला यांनी प्रेमविवाह केला. शशिकला यांना दोन मुलीही आहेत.