ब्रिटीश गायक एड शीरनचे (Ed Sheeran) जगभरात चाहते आहेत. भारतातही त्याच्या फॅन फॉलोइंगची कमी नाही. अगदी बॉलिवूड सेलिब्रिटीही त्याला फॉलो करतात. एड शीरन नुकताच भारत दौऱ्यावर आला आहे. त्याची 'द मॅथमेटिक्स टूर' सुरु आहे. बंगळुरुत दोन शोज केल्यानंतर नुकताच तो चक्क अरिजीत सिंहच्या (Arijit Singh) गावी गेलेला दिसला. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जियागंज येथील अरिजीतच्या घरी तो दाखल झाला. अरिजीतने एडला चक्क त्याच्या स्कुटरवर बसवून अख्खं गाव फिरवलं. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अरिजीत सिंहच्या साध्या राहणीमानाची तर नेहमीच चर्चा असते. तो त्याच्या गावी स्कुटरवर फिरताना दिसलेला आहे. कधी पिशवी घेऊन सामान आणायला जाताना दिसला आहे. पण आता चक्क त्याने एका ब्रिटीश गायकालाही आपल्या स्कुटरवरुन फिरवलं. दोघंही मस्त हेल्मेट न घालता गल्लोगल्ली फिरताना दिसले. अगदी सामसूम रस्त्यावरही अंधारात ते स्कुटरवरुन जाताना दिसत आहेत. शितबाला घाट, भागीरथी घाट इथेही त्यांनी तासभर बोटींगचा आनंद घेतला. जवळपास पाच तास दोघं सोबत होते. तसंच एडने कोणतीही सुरक्षा नको असंही स्पष्ट सांगितलं होतं अशी माहिती स्थानिक डीआयजीने दिली आहे.