काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिने सोशल मीडियावर मायोसायटिस या आजाराने त्रस्त असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर या आजारावर संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली. हा आजार दुर्मिळ असला तरी त्याचे निदान होण्यात बराच कालावधी निघून जातो. अनेकवेळा लक्षणांपुरता इलाज होतो. मात्र, तो आजार पूर्णपणे बरा होत नाही. त्याची पुन्हा काही महिन्याने पुनरावृत्ती होते. विशेष म्हणजे, या आजारामध्ये स्नायूंना सूज येऊन प्रचंड थकवा जाणवतो. चालायला, गिळायला आणि श्वास घ्यायला त्रास होतो. सर्वसाधारणपणे लक्षणे दिसायला साधी वाटत असली तरी रुग्णाला तो त्रास एका टप्प्यानंतर सतत होत राहतो.
देशात या आजाराचे निदान आणि उपचार करणारे डॉक्टर कमी आहेत. हा विषय प्रामुख्याने रुम्याटोलॉजिस्ट विषयांचे तज्ज्ञ पाहतात. त्यानंतर न्यूरॉलॉजिस्ट आणि काही ठिकाणी औषधवैद्यक शास्त्राचे डॉक्टर यावर उपचार करतात. इंडियन जर्नल ऑफ रुम्याटोलॉजीनुसार जगभरात बहुतांश देशात एक लाखामागे १४- २२ रुग्ण या आजाराचे आढळतात.
अभिनेत्री सामंथा सोशल मीडियावरील पोस्टमध्ये काय म्हणते... काही महिन्यांपूर्वीच मायोसायटिस नावाच्या दुर्मिळ आजाराचे निदान झाले आहे. मला यातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांशी हे शेअर करायचे होते; पण यातून पूर्ण बाहेर पडायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतो आहे, असे तिने सांगितले. सामंथाने पलंगावर बसलेला स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. तिच्या मनगटावर सलाइन लावलेले दिसत आहे.
लक्षणे सतत बारीक ताप त्वचेवर पुरळ येणे अशक्तपणा पायऱ्या चढण्यास अडचण उभे राहण्यास अडचण प्रसाधनगृहात बसण्यास अडचण चालताना पडण्याची शक्यता असते एकदा बसल्यानंतर उठण्यास त्रास श्वास घ्यायला त्रास
एक लाख मुलांमध्ये एका मुलाला हा आजार होण्याची शक्यता असते. या विषयात मी गेली अनेक वर्षे काम करत आहे. माझ्याकडे जी मुले येतात त्यांना जुव्हेनाइल डर्माटो मायोसायटिस हा आजार झालेला असतो. उपचारासाठी स्टिरॉइड्स आणि प्रतिकारशक्ती नियंत्रित करणाऱ्या (इम्युनोस्प्रेसंट) औषधांचा समावेश असतो. दोन वर्षांच्या व्यवस्थित उपचारानंतर रुग्ण बरा होतो. - डॉ. राजू खुबचंदानी, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ, एसआरसीसी बाल रुग्णालय या आजाराचे कारण अजून माहिती नाही. यामध्ये प्रतिकारशक्तीत दोष निर्माण होतात, त्याला ऑटोइम्यून डिसऑर्डर असे म्हणतात. या आजारात मुख्य शरीराचे स्नायू प्रचंड दुखतात. वेळीच उपचार केले नाही तर बोलण्यास, गिळण्यास आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. मोठ्या कालावधीसाठी औषधे घ्यावी लागतात. - डॉ. सी. बालकृष्णन, रुम्याटोलॉजिस्ट, हिंदुजा रुग्णालय