अभिनेत्री स्मिता पाटील यांचा लेक आणि सुप्रसिद्ध अभिनेता प्रतीक बब्बर हा कायमच चर्चेत असतो. प्रतीक वेळोवेळी आई स्मिता पाटील यांची आठवण जागवत असतो. प्रतीकने आईच्या नावाचा टॅटूही शरीरावर गोंदवून घेतलाय. अशातच आईला आदरांजली म्हणून प्रतीकने एक खास गोष्ट केलीय. त्यामुळे सगळीकडे त्याचं कौतुक होतंय. स्मिता पाटील यांच्या 'मंथन' सिनेमाचं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग झालं. त्यानिमित्ताने आईचा सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या प्रतीकने स्मिता यांच्या साडीपासून खास कपडे परिधान केले होते.
स्मिता पाटील यांच्या साडीपासून प्रतीकने तयार केले खास कपडे
प्रतीक बब्बर नुकतंच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता. आई स्मिता पाटील यांच्या 'मंथन' सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी प्रतीकने उपस्थिती दर्शवली होती. प्रतीकला या खास क्षणासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यासाठी प्रतीकने त्याचा डिझायनर विजयला याविषयी सूचना दिल्या. स्मिता पाटील यांना आदरांजली देण्यासाठी खास लूक डिझाईन करण्याची कल्पना विजय यांना सुचली.
आईच्या कांजीवरम साडीपासून तयार झाला प्रतीकचा ड्रेस
प्रतीकचा ड्रेस कसा तयार करायचा यासाठी डिझायनर विजय डोकं लावत होते. यासाठी त्यांना प्रतीकच्या मावशीने मदत केली. स्मिता यांच्या दोन रेशमी कांजीवरम साड्या त्यांनी दिल्या. या दोन साड्यांपासून काळ्या रेशमी धाग्यात क्रॉप्ड डबल-ब्रेस्टेड टक्सीडो ड्रेस त्यांनी तयार केला. या ड्रेसचं खूप कौतुक होतंय. अशाप्रकारे आईचा 'मंथन' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या प्रतीकने स्मिता पाटील यांना अशाप्रकारे अनोखी आदरांजली वाहिली.