Cannes Film Festival 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये कोलकाताची अभिनेत्री अनसूया सेनगुप्ताने इतिहास रचला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर तिने आपली मोहोर उमटवली आहे. 'शेमलेस' या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 या पुरस्काराने सन्मानित होणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.
७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सध्या बड्या कलाकारांची रेलचेल सुरू आहे. हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांसोबतच अनेक फॅशन इनफ्लूएन्सर्सनी या फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबतच आलिया भट्ट, कियारा अडवाणी, प्रीती झिंटा या अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्याने सगळ्यांनाच घायाळ केलं. त्यातच अनसूया सेनगुप्ताच्या कामगिरीने साऱ्या जगाच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत.
कोण आहे अनसूया सेनगुप्ता?
मुंबईसारख्या अनोळखी शहरात अभिनेत्रीने एक प्रोडक्शन डिझायनर म्हणून स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली. सध्या अनसूया गोव्यात वास्तव्यास आहे. बहुचर्चित 'मसाबा मसाबा' या नेटफ्लिक्स शोच्या सेटचं डिझाईन देखील तिनेच केलं आहे.
कोलकातामधील जाधवपूर युनिव्हर्सिटीमधून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यासोबतच अनसूयाने इंग्लिश लिट्रेचरमध्ये देखील पदवी प्राप्त केली आहे. २००९ साली आलेल्या 'मैडली बंगाली' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्याचबरोबर मुंबईमध्ये काही थिएटरमध्येही काम केल्याचं सांगितलं जातं.
नॉमिनेशनबद्दल कळताच नाचू लागली होती अभिनेत्री-
द कोलकाता दिलेल्या मुलाखतीत तिने या पुरस्काराबद्दल भाष्य केलं होतं. मुलाखती दरम्यान ती म्हणाली, "जेव्हा मला कळालं की तिच्या चित्रपटाला कान्समध्ये नामांकन मिळालं आहे, त्या क्षणी तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये ज्या वेळी आमच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हा मी खुर्ची सोडून नाचू लागले."
कसा आहे 'शेमलेस' सिनेमा-
अभिनेत्री अनसूया सेनगुप्ताच्या 'शेमलेस' या चित्रपटाला कान्समध्ये नामांकन मिळालं. या चित्रपटाचं कथानक रेणुका नावाच्या पात्राच्या अवती-भोवती फिरणार आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर रेणुकाच्या आयुष्यात नवं वादळ येतं. त्यानंतर ती दिल्लीच्या वेश्यालयातून पळून जाते. अशी या चित्रपटाची कहाणी आहे.