माही गिल सध्या एकता कपूरच्या अल्ट बालाजीच्या फिल्टर या वेबसिरिजमध्ये काम करत असून या वेबसिरिजचे चित्रीकरण ठाण्यात सुरू आहे. पण या वेबसिरिजच्या सेटवर नुकतीच क्रू मेंबरना मारहाण करण्यात आली. ही घटना ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका सेटवर घडली असून या वेबसिरिजचे दिग्दर्शन तिग्मांशू धुलिया करत आहे. याविषयी ठाणे पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली असून यावेळी सेटवर माहीप्रमाणेच तिग्मांशू धुलिया, शब्बीर आहुवालिया तसेच तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.
फिल्टर या वेबसिरिजच्या सेटवर काय झाले हे तिग्मांशू धुलिया यांनी ट्वीटर अकाऊंटवरून सांगितले आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओत या चित्रपटाची टीम एका रुग्णायलाच्या बाहेर उभी असून त्यांच्यासोबत माही गिल देखील दिसत आहे. तसेच या वेबसिरिजचे कॅमेरामॅन संतोष तुंडियाल या व्हिडिओत दिसत असून त्यांच्या डोक्याला पट्टी बांधलेली आहे.
फिल्टर या वेबसिरिजचे चित्रीकरण सकाळी सात वाजल्यापासून घोडबंदर येथे सुरू होते. संध्याकाळी साडे चार वाचता काही लोक सेटवर आले आणि त्यांनी तोडफोड केली. हल्ला करणारे सगळेच दारूच्या नशेत होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या वेबसिरिजचे निर्माते साकेत साहनी यांनी सांगितले आहे की, या गुंडांनी कॅमेरा तोडण्याचा प्रयत्न केला. पण संतोष यांनी गुंडाना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच इतर क्रू मेंबर्सना देखील त्यांनी मारले. तसेच महिलांसोबत गैरवर्तुणूक करण्याचा प्रयत्न केला. या गुंडांना पैसे हवे होते. पण आमच्याकडे चित्रीकरणासाठी सगळी परवानगी असल्यामुळे आम्ही त्यांना पैसे द्यायला नकार दिला. त्यावर पैसे दिल्याशिवाय चित्रीकरण होऊन देणार नाहीत असे त्यांनी सांगितले आणि तोडफोड करायला सुरुवात केली. तसेच आमच्या टीमला मारहाण केली. या वेबसिरिजमध्ये काम करणाऱ्या माही गिलने सांगितले की, हल्लेखोरांना पाहाताच मी गाडीकडे धावले आणि कसेबसे स्वतःला वाचवले. आमच्या क्रू मेंबर्संना त्यांनी प्रचंड मारहाण केली. आमच्या क्रू मेंबर्सना आम्ही लगेचच रुग्णायलाय घेऊन गेलो आणि याची तक्रार आम्ही ठाणे पोलिसांकडे केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून ते चौकशी करत आहेत.