Join us

Indrani Mukherjee Documentary : नेटफ्लिक्सवर इंद्राणी मुखर्जीचा माहितीपट प्रदर्शित न करण्यासाठी सीबीआयचा विशेष न्यायालयात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 10:55 AM

शीना बोरा हत्याकांडावर आधारित 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रुथ' हा माहितीपट नेटफ्लिक्स वर २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

शीना बोरा हत्याकांडप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीवर माहितीपट प्रसारित करू देऊ नये, असा अर्ज सीबीआयने विशेष न्यायालयात शनिवारी दाखल केला. 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : द ब्यूरिड टुथ' या शीर्षकाखाली २३ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर माहितीपट प्रसारित होणार आहे. हा माहितीपट प्रसारित करण्यात येऊ नये, यासाठी सीबीआयने विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी ठेवली.

"नेटफ्लिक्सला या प्रकरणाशी संबंधित आरोपी आणि व्यक्तींना माहितीपटात दाखवण्यास बंदी घालण्याचे निर्देश जारी करावेत आणि खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत ते प्रसारित करू नये", असे सरकारी वकील सी.जे. नांदोडे यांच्यामार्फत दाखल केलेल्या अर्जात म्हटलं आहे.  विशेष सीबीआय न्यायाधीश एसपी नाईक-निंबाळकर यांनी नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट सर्व्हिसेस इंडिया आणि इतरांना या अर्जावर उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली.  त्यामुळे सर्वत्र शीना बोरा हिच्या हत्याकांडाची चर्चा रंगत आहे.

सध्या इंद्राणी जामिनावर बाहेर आहे.  'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रूथ' माहितीपटामध्ये मुखर्जी स्वत: तसेच तिचे कुटुंबीय, वकील आणि या प्रकरणाचा पर्दाफाश करणाऱ्या अनुभवी पत्रकारांच्या मुलाखतींचा समावेश आहे. शीना बोरा हत्याकांडानंतर अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. या हत्याकांडातील आरोपींशी निगडीत असलेल्या राजकारणी, पोलिस अधिकारी आणि नातेसंबंधाचे जाळे समोर आलं. हे प्रकरण संजय सिंह यांनी कव्हर केलं होतं. त्यांनी यावर 'एक थी शीना बोरा' पुस्तकही लिहिलं होतं. याच पुस्तकावर ही सिरीज आधारित आहे.

टॅग्स :इंद्राणी मुखर्जीसेलिब्रिटीबॉलिवूडनेटफ्लिक्स