बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या नसून हे एक कटकारस्थान आहे, असा दावा त्याचे अनेक चाहते, बॉलिवूडचे काही मंडळी करत आहेत. याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणीही केली जात आहे. काल सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिनेही सोशल मीडियावर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना सुशांत मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली आहे. सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची काहीही गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिस अशा प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची गरज नाही, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. सीबीआय चौकशीसाठी सोशल मीडियावर मोहिम चालवली जात आहे. मला याची कल्पना आहे. मात्र पोलिस सर्वबाजूंनी तपास करत आहेत. आत्तापर्यंतच्या तपासात कुठल्याही कटकारस्थानाचा खुलासा झालेला नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाचा तपशील सार्वजनिक केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई पोलिसांनी गुरूवारी याप्रकरणी हिंदुजा हॉस्पीटलच्या सिनीअर सायकायट्रिस्टचीही चौकशी केली. ते सुशांतवर उपचार करत होते. सुशांत हा डिप्रेशनवर उपचार घेत होता. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, बॉलिवूडशी संबंधित काही लोक अशा एकूण 36 लोकांचा जबाब नोंदवला आहे.गेल्या 14 जूनला सुशांत त्याच्या मुंबईतील घरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला होता. प्राथमिक तपासात पोलिसांना काहीही संशयास्पद आढळून आलेले नही. पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही सुशांतचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचे म्हटले आहे. तूर्तास पोलिसांनी सुशांतच्या फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा आहे.