बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आता 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. पोलिसांनीदेखील आतापर्यंत जवळपास 28 लोकांचा जबाब नोंदवला आहे. मात्र सुशांतचे चाहते त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. ते पोलिसांच्या कारवाईवर समाधानी नाहीत. सोशल मीडियावर सुशांत आत्महत्या प्रकरणी सीबीआयने चौकशी करावी ही मागणी जोर धरताना दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेता शेखर सुमनदेखील सुशांत आत्महत्या प्रकरणाची सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी करत आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर #CBIMustForSushant ट्रेंड करत आहेत.
सुशांतचे चाहते त्याच्या आत्महत्यामागे वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. मात्र तर्कवितर्क वेगळे असले तरी ते सगळेच सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.
एका युजरने लिहिले की, सुशांत एक फायटर होता. त्याला चॅलेजेंस आवडत होते. तो खूप पॉझिटिव्ह होता. तो कधीच स्वतः जीवन संपवू शकत नाही. मला आशा आहे की तुम्ही जिथे असाल तिथे खूश असाल. जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
तर दुसऱ्या एका युजरने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला. ट्विट केले की, जेव्हा तुम्हाला विरोध केला पाहिजे तेव्हा तुमचे शांत बसणे चुकीचे आहे. तुम्ही सीबीआय चौकशीचा आदेश का देत नाही संपूर्ण देश मागणी करतो आहे. काही असेही लोक आहेत ज्यांना विश्वास आहे की दोषींचा पर्दाफाश होईल आणि सुशांतला न्यायही मिळेल.
सुशांतचे चाहते आपले मत सोशल मीडियावर व्यक्त करत सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.