सुवर्णा जैन
‘मी एक मराठी मुलगी असून त्याचा मला अभिमान आहे तसंच संधी मिळाली तर मराठीत काम करायला आवडेल’ असं अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने म्हटले आहे. आगामी 'बत्ती गुल मीटर चालू' या सिनेमाच्या निमित्ताने श्रद्धाने लोकमतसह खास संवाद साधला. यावेळी देशातील विजेची समस्या, आगामी सिनेमा याविषयी तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या.
तू आजवर विविध प्रकारच्या आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेस. रोमँटिक असो किंवा मग एखादी हटके भूमिका. तिला तू पुरेपूर न्याय दिला आहेस. तर 'बत्ती गुल मीटर चालू' या सिनेमातील भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल?
'बत्ती गुल मीटर चालू' या सिनेमात उत्तराखंडमधल्या तरुणीच्या भूमिकेत मी दिसणार आहे. तिचे नाव ललिता नौटियाल असं आहे. लाडाने तिला नॉटी असं म्हटलं जातं. ही तरुणी स्वतंत्र विचारांची आणि मूल्यं तसंच तत्त्वनिष्ठ आहे. योग्य ते योग्य आणि जे चुकीचे त्यावर रोखठोक बोलणारी अशी आहे. मात्र ती स्वतःला जगातील सगळ्यात बेस्ट डिझायनर समजते. आकर्षक आणि डिझायनर कपडे परिधान करणे, मिसमॅच कपडे घालणे असा तिचा स्वभाव आहे. त्यामुळे जणू काही ती बेस्ट डिझायनर असल्याप्रमाणे वागते. मात्र प्रत्यक्षात ती तशी नाही. त्यामुळेच तिचे मित्र त्रिपाठी आणि एस. के. तिची खिल्ली उडवतात. याआधी 'हैदर' सिनेमातही अशी भूमिका साकारली होती. मात्र त्या सिनेमात मी एका काश्मीरी तरुणीच्या भूमिकेत झळकले होते.
'बत्ती गुल मीटर चालू' या सिनेमातील कोणती गोष्ट तुला विशेष भावली की तू सिनेमाला तात्काळ होकार दिला?
या सिनेमाची कथा मला विशेष भावली. सिनेमाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेली समस्या आज देशातली सगळ्यात मोठी समस्या आहे. वीज कंपन्या अव्वाच्या सव्वा वीज बिल नागरिकांकडून आकारतात. या बिल आकारणीमुळे नागरिक त्रस्त आहेत. याच विषयाला सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आलंय. शिवाय कोणत्याही प्रकारची भाषणबाजी न करता सहजसोप्या पद्धतीने सिनेमाची कथा मांडण्यात आलीय. त्यामुळे हा विषय भावल्यानेच सिनेमात काम करण्यास तयार झाले.
'टॉयलेट एक प्रेमकथा', 'पॅडमॅन' अशा सिनेमातून लोकांपर्यंत एक विचार पोहचला आणि त्यातून समाजात बदल घडत असल्याचे आपण बघतो. तसंच 'बत्ती गुल मीटर चालू' या सिनेमातून बदल घडेल असं वाटतं का?
सिनेमा हा समाजाचा आरसा असतो. सिनेमाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी नागरिकांपर्यंत यशस्वीरित्या पोहचवल्या जातात. सिनेमा बऱ्याच अंशी लोकांचं मतपरिवर्तन करण्यात मोलाचा वाटा उचलतो. त्यामुळे या सिनेमातून नक्कीच लोकांच्या विचारांमध्ये किंवा या समस्येकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल असं वाटतं.
अचानक वीज जाण्याचा आणि त्यामुळे त्रास झाल्याचा अनुभव तुला आला आहे का?
विजेचा पुरवठा खंडीत होणं हा अनुभव प्रत्येकानं घेतलेला आहे. वीज नसली तर किती कामं अडतात हे प्रत्येकाला चांगल्याप्रकारे माहिती आहे. मात्र अनेकदा आपण जेवढी वीज वापरली तेवढंच बिल नक्की आलं आहे का हे कुणालाही कळत नाही. कारण वीज कंपन्या कोणत्या आधारे वीज बिल पाठवतात हे आपल्यापैकी कुणीच पाहात नाही. ते वापराच्या आधारावर पाठवतात किंवा काय हे बहुतांशी कुणालाच माहिती नसतं. त्यामुळे आलं तेवढं वीज बिल भरुन नागरिक आपापल्या कामाला लागतात. लोकांनी याबाबत सजग होणं गरजेचे आहे. कदाचित या सिनेमातून भरमसाठ वीज बिलाच्या समस्येवर जनजागृती होईल असं वाटतं.
भरमसाठ वीजबिल किंवा वीजेच्या तसंच वीज चोरीबाबत जनताही जबाबदार आहे असं तुला वाटतं का?
विजेची समस्या ही देशात आहे. लहान लहान गावात वीज पोहचलेली नाही. त्यामुळे अनेकदा वीज चोरीही होते. त्यामुळे वीज बिल असो किंवा वीज चोरी अशा सगळ्या विषयांवर भाष्य करणारा 'बत्ती गुल, मीटर चालू' हा सिनेमा रसिकांना आवडेल.
फुलराणी सायना नेहवाल बनून तू रुपेरी पडद्यावर एंट्री मारणार आहेस. या बायोपिक सिनेमातील भूमिकेसाठी तू सध्या पहाटे 5 वाजता उठून प्रशिक्षणही सुरु केल्याचे ऐकायला मिळतंय. तर त्याबाबत रसिकांना काय सांगशील?
प्रशिक्षण तर सुरु आहे. आतापर्यंत जवळपास 40 क्लासेस पूर्ण झालेत. या बायोपिकची तयारी सुरु आहे. या भूमिकेसाठी स्वतःला तयार करण्यासाठी मेहनत घेत आहे. मात्र माझ्या मते बॅडमिंटन हा एक कठीण खेळ आहे. त्यासाठी कठोर परिश्रमही तितकेच गरजेचे आहेत. त्यामुळे सध्या इतर गोष्टींवर मेहनत घेत असून त्यानंतर बॅडमिंटनचे धडे घेण्यास सुरुवात करणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला या बॅडमिंटनच्या भागाच्या शुटिंगला सुरुवात होईल.
बायोपिक सिनेमात भूमिका साकारणं आणि इतर सिनेमातील भूमिका यांत सगळ्यात आव्हानात्मक काय आहे असं तुला वाटतं आणि का ?
बायोपिक सिनेमातील ही भूमिका खरंच खूप आव्हानात्मक आहे असं मी मानते. कारण चॅम्पियन बनणं ही काही सहज सोपी गोष्ट नाही. त्यासाठी कठोर तपश्चर्या म्हणजेच कठोर मेहनत लागते. कारण एखादा स्पोर्ट्सपर्सन बालपणापासून त्यावर मेहनत घेतात. अनेक वर्षे मेहनत घेतल्यानंतर ते त्या खेळात प्राविण्य मिळवतात किंवा यश संपादन करतात. या सगळ्या गोष्टी रुपेरी पडद्यावर दाखवता याव्या यासाठी मी माझ्या परिने पूर्णपणे प्रयत्न करेन.
श्रद्धा तुझं मराठीशी एक वेगळं नातं आहे, तुला मराठी बोलायला आवडतं का ?
सगळ्यात आधी तर मी महाराष्ट्रीयन आहे. माझी आई मराठी आहे त्यामुळे माझ्यावर सगळे महाराष्ट्रीयन आणि मराठी संस्कार झालेत. बोलायचं झाले तर अर्धी पंजाबी आणि अर्धी मराठी अशी मी आहे. मात्र माझं बालपण सगळं मराठी वातावरणात गेलंय. त्यामुळे मराठी माझ्या खूप जवळ आहे. त्यात माझे आजी-आजोबा आमच्या इमारतीतच राहत असल्यामुळे त्यांच्यासोबत बराच काळ मी घालवला आहे. त्यामुळे लहानाची मोठी मी या मराठी वातावरणातच झाले. म्हणून मी स्वतःला मराठी मुलगी समजते.
मराठी सिनेमात तू कितपत फॉलो करते आणि कोणता मराठी सिनेमा तू पाहिला आहेस का ?
खरं सांगायचा तर मराठी सिनेमाबद्दल जेवढं ऐकलंय त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून मराठी सिनेमा पाहाण्याची इच्छा आहे. खूप वर्षांपासून मी मराठी सिनेमा पाहिलेला नाही. बहुदा 'चिमणी पाखरं' हा सिनेमा मी पाहिला होता. मात्र मराठी सिनेमातील शब्द मला कितपत समजतील असंही वाटतं. तरीही मी लवकरच एखादा मराठी सिनेमा पाहणार आहे.
श्रद्धाला मराठी सिनेमात काम करायला आवडेल का ?
मराठीत नक्कीच काम करायला आवडेल. माझ्यासाठी नक्कीच ती आनंदाची बाब असेल. एखादी चांगली स्क्रीप्ट आणि कथा आली तर नक्कीच मी मराठी सिनेमात काम करेल.