बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या 'चमकिला' चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात परिणीतीसोबत गायक दिलजीत दोसांझ दिसणार आहे. 'जब वी मेट', 'रॉकस्टार' आणि 'लैला मजनू' सारखे अनेक चित्रपट बनवणाऱ्या इम्तियाज अलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. प्रसिद्ध गायक अमरसिंग चमकीला यांच्यावर आधारित हा चित्रपट चित्रपटगृहात नाही तर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यासोबतच चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. परिणीती-दिलजीतचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट 'अमर सिंह चमकीला' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
नेटफ्लिक्सने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाच्या ओटीटी रिलीजची घोषणा केली आहे. व्हिडीओ शेअर करत नेटफ्लिक्सने लिहिलं आहे, "माहोल बन जाता था जब वह छेडता था साज, कुछ ऐसा ही था 'चमकीला'का अंदाज". 'अमर सिंह चमकीला' हा चित्रपट १२ एप्रिलपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिलजीत आणि इम्तियाजने पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे.
'चमकीला' हा सिनेमा अमर सिंह चमकीला यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात दिलजीत दोसांझ अमह सिंह चमकीला यांची भूमिका साकारणार आहे. तर परिणीती चोप्रा अमरजोत कौरच्या भूमिकेत झळकेल. अमह सिंह चमकीला यांच्या संघर्षापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. प्रेक्षक आता या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.