बॉलिवूडसाठी हे वर्ष अतिशय दु:खद वर्ष ठरले. गेल्या काही महिन्यांत बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. शनिवारी बॉलिवूड अभिनेता रंजन सहगल यांच्या निधनाची बातमी आली आणि सगळेच हादरले. वयाच्या केवळ 36 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. मल्टिपल ऑर्गन फेलियरमुळे त्यांचे निधन झाले.रंजन पंजाबच्या जीरकपूर येथे होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना चंदीगड येथील रूग्णालयात हलविण्यात आले. व्हेंटिलेटरची डिमांड करण्यात आली. मात्र तात्काळ व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ न शकल्याने काही वेळात त्यांचा मृत्यू झाला.
रंजन गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मुंबईत एकटे राहत असल्याने ते त्यांच्या गावी परतले होते. श्वास घेण्यात त्रास होत असल्याने त्यांची कोरोना टेस्टही केली गेली होती. मात्र ती निगेटीव्ह आली होती.
त्यांच्या निधनाने बॉलिवूड व पंजाबी चित्रपटसृष्टीत शोकळा पसरली आहे. रंजन यांनी टीव्हीशिवाय बॉलिवूड व पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत काम केले. रंगभूमीपासून सुरुवात करणाºया रंजन यांनी क्राईम पेट्रोल, रिश्तों से बडी प्रथा, सावधान इंडिया अशा अनेक मालिकांमध्ये काम केले होते. शाहरूख खानचा ‘झिरो’ आणि रणदीप हुड्डासोबत ‘सरबजीत’ या सिनेमातही ते झळकले होते.रंजन शाळेत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कॉलेजच्या दिवसांत पार्ट टाईम नोकरी करून त्यांनी आपले शिक्षण केले. याच दिवसांत त्यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. 2014 मध्ये त्यांनी नव्या छाब्रासोबत लग्न केले होते. मात्र त्यांचा घटस्फोट झाला होता.