अमिताभ बच्चन यांच्या डॉन या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटात अमिताभ डबल रोलमध्ये झळकले होते. या चित्रपटात झीनत अमान, प्राण यांच्यादेखील मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटातील सगळ्याच गाण्यांवर आजदेखील लोक ताल धरतात. हा चित्रपट केवळ एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राला कर्जातून बाहेर काढण्यासाठी बनवला होता. हे दोन मित्र आहेत नरिमन इराणी आणि चंद्रा बारोट.
बोल भिडूने दिलेल्या वृत्तानुसार, प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर नरिमन इराणी यांनी सुनील दत्त यांची मुख्य भूमिका असलेल्या जिंदगी जिंदगी या चित्रपटाची निर्मिती केली होती. पण हा चित्रपट फ्लॉप झाल्याने त्यांच्यावर १२ लाखाचे कर्ज झाले. या चित्रपटानंतर ते रोटी कपडा मकान या चित्रपटाच्या टीमसोबत काम करत होते. त्यावेळी त्यांची ओळख चंद्रा बारोट यांच्यासोबत झाली. त्या दोघांची या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घट्ट मैत्री झाली. इराणी यांनी एकदा चंद्रा यांच्याकडे हजार रुपये मागितले. त्यांनी कारण न विचारता केवळ मैत्रीखातर इराणी यांना लगेचच पैसे दिले. पण काही दिवसांनी इराणी यांनी पुन्हा १० हजार रुपये मागितल्यावर त्यामागचे कारण त्यांनी विचारले. त्यावर इराणी यांनी त्यांच्यावर असलेल्या कर्जाबाबत चंद्रा यांना सांगितले. त्यावर चंद्रा यांनी इराणी यांना एखादा चित्रपट बनवण्याबाबत सुचवले. या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांनी अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांना विचारले आणि त्या दोघांनी होकार देखील दिला. चित्रपटाच्या कथेच्या शोधात असताना ते सलीम खान यांना भेटले.
सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्याकडे एक कथा होती. पण या कथेला अनेक निर्मात्यांनी नकार दिला होता. ही कथा त्यांनी इराणी यांना दिली आणि तिथून डॉन या चित्रपटाच्या प्रवासाला सुरुवात झाली. पैसे नसल्याने हा चित्रपट बनवण्यासाठी कर्ज घेण्यात आले. तसेच चंद्रा यांच्या बहिणीने देखील त्यांना आर्थिक साहाय्य केले. पण चित्रपट बनवत असताना अनेक संकंटं आली. प्राण यांचा एक अपघात झाला तर नरिमन इराणी यांचे अचानक निधन झाले. चंद्रा यांनी मित्रासाठी हा चित्रपट बनवण्याचे ठरवले होते. पण त्याच मित्राचे निधन झाल्याने त्यांना धक्का बसला. पण आम्हाला पैसे दिले नाही तरी चालेल. पण आपण चित्रपट पूर्ण करू असे म्हणत चित्रपटातील मुख्य कलाकारांनी चंद्रा यांना धीर दिला आणि अशाप्रकारे हा चित्रपट पूर्ण झाला.
डॉन या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रा यांनी तर निर्मिती इराणी यांनी केली होती. या चित्रपटाला पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. पण दुसऱ्या आठवड्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच गर्दी होऊ लागली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कलेक्शन केले आणि त्यातून इराणी यांच्या पत्नीने त्यांच्यावर असलेले सगळे कर्ज फेडले.