‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटाद्वारे अॅक्टिंगच्या दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता चंद्रचूड सिंग याचा आज वाढदिवस. ‘माचिस’ या चित्रपटाने त्याला खरी ओळख दिली. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. ‘चप्पा चप्पा चरखा चले’ या गाण्यातील चंद्रचूड सिंग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘माचिस’ नंतर त्याने दिल क्या करे, दाग द फायर, जोश, क्या कहेना , आमदनी अठ्ठन्नी और खर्चा रूपय्या अशा विविध सिनेमात भूमिका साकारल्या.
‘जोश’मध्ये चंद्रचूड ऐश्वर्या रायसोबत स्क्रिन शेअर करताना दिसला. ऐश्वर्या रायचा चंद्रचूड आवडता अभिनेता होता. खुद्द ऐश्वर्याने एका मुलाखतीत ही कबुली दिली होती. चंद्रचूडने एकापाठोपाठ एक डझनावर चित्रपटांत काम केले. पण यानंतर अचानक तो गायब झाला.होय, सिनेमांच्या ऑफर मिळणे बंद झाले आणि चंद्रचूड हळूहळू बॉलिवूडमध्ये दिसेनासा झाला.
याचदरम्यान 2000 साली मुंबईत बोटिंग करताना चंद्रचूडला गंभीर अपघात झाला. या अपघातात त्याच्या दोन्ही खांद्यांना जबर दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की त्यातून सावरण्यासाठी त्याला तब्बल 10 वर्षे लागलीत. दुखापतीमधून सावरण्यासाठी त्याला त्याची सगळी कमाई खर्ची करावी लागली. करिअर ठप्प पडले. तो आर्थिक संकटात सापडला.
अर्थात यानंतरही चंद्रचूडने हिंमत सोडली नाही. ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटातून त्याने कमबॅक केले. पण त्याचा हा कमबॅक सिनेमा दणकून आपटला. पैशांसाठी या काळात चंद्रचूडने अनेक छोट्यामोठ्या भूमिका केल्यात. अगदी मिळेल ते काम स्वीकारले. पण त्याच्या करिअरची गाडी पुन्हा रूळावर येऊ शकली नाही. ‘The Reluctant Fundamentalist’ हा त्याचा अखेरचा सिनेमा होता.
खरे तर अपघात होण्याआधीच चंद्रचूड बॉलिवूडपासून दूर गेला होता. तो सुद्धा जाणीवपूर्वक. होय, एका मुलाखतीत त्याने याचे कारण सांगितले होते. सुरुवातीच्या काळात काही हिट चित्रपट दिल्यानंतर मला काही वेगळ्या भूमिका हव्या होत्या. मला अनेक ऑफर आल्यात. पण हटके भूमिकांच्या नादात मी अनेक चित्रपट नाकारले. हटके भूमिका मिळाल्या नाहीत आणि मी हळूहळू बॉलिवूडपासून दूर गेलो. पुढे काम न मिळाल्याने मी कॅमिओ रोलही केलेत , असे त्याने सांगितले होते.