'चंद्रयान ३'(Chandrayaan 3)ला मिळालेल्या यशाचे संपूर्ण जगाने कौतुक केल्यानंतर आता हा सुवर्णअध्याय रुपेरी पडद्यावर सादर करण्याची फिल्ममेकर्समध्ये शर्यत सुरू झाली आहे. शीर्षक नोंदणीसाठी फिल्ममेकर्स घाई सुरू आहे. काहींनी आपल्या चित्रपटाच्या शीर्षकाची नोंदणीही केल्याची माहिती मिळाली आहे.
भारताचा मंगळप्रवास दाखवणाऱ्या 'मिशन मंगल' चित्रपटाचे दिग्दर्शक जगन शक्ती यांनी थेट 'चंद्रयान ३'वर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार असेल की नाही याबाबतची माहिती तूर्तास मिळू शकलेली नाही. भारताने चंद्रावर घेतलेली विक्रमी झेप पडद्यावर सादर करण्याची संधी आपल्याला हातची दवडू द्यायची नसल्याचे जगन यांचे म्हणणे आहे.
जगन शक्ती म्हणाले की, सध्या चित्रपटाच्या कथेवर विचार काम करत आहे. कथेबाबत निर्णय घेण्यापूर्वी इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असलेल्या आपल्या थोरल्या बहिणीकडून माहिती घेणार असल्याचेही जगन म्हणाले. जगन यांच्याखेरीज आणखी काही निर्माते आणि निर्मितीसंस्था 'चंद्रयान ३'वर चित्रपट बनवण्याच्या शर्यतीत आहेत. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन, प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि इंडियन फिल्म अँड टेलीविजन प्रोड्यूसर्स काउंसिलच्या मुंबईतील कार्यालयांमध्ये शीर्षक नोंदणीसाठी अर्ज आल्याची माहिती मिळाली आहे. यापैकी काहींना चित्रपट बनवण्याची परवानगी देण्यात आल्याचे सांगत इम्पाच्या अधिकाऱ्यांकडून समजले आहे. आलेल्या सर्व अर्जांचा पुढील आठवडात विचार केल्यानंतर काही निर्मात्यांना चित्रपट बनवण्याची परवानगी देण्यात येणार आहे.