कार्तिक आर्यनच्या बहुचर्चित 'चंदू चँपियन' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. 'चंदू चँपियन'मार्फत कबीर खान यांनी महाराष्ट्राच्या मातीत घडलेल्या जिगरबाज माणसाची कहाणी सर्वांसमोर आणलीय. भारताला पॅरालिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांची प्रेरणादायी गाथा आपल्याला सिनेमात दिसतेय. 'चंदू चँपियन' रिलीज झाल्यावर पहिल्या दिवशी सुरुवात निराशाजनक झाली होती. परंतु दुसऱ्या दिवशी 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झालेली दिसतेय.
'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ
१४ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या 'चंदू चँपियन' सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ ४.७५ कोटींची कमाई केली होती. सिनेमाचे बजेट १२० कोटी रुपये असल्याने ओपनिंग डेची ही कमाई खूप कमी मानली जात बोती. पहिल्या दिवशी सिनेमाचे तिकीट १५० रुपयांना मिळत होते. असं असूनही 'चंदू चँपियन'ला जास्त प्रेक्षक जमवता आले नाहीत. पण दुसऱ्या दिवशी वीकेंडचा फायदा मात्र सिनेमाला मिळाला. दुसऱ्या दिवशी सिनेमाचे एकूण कलेक्शन ६ कोटी रुपये होते. एकूणच चित्रपटाने दोन दिवसांत ११ कोटींची कमाई केली आहे.
'चंदू चँपियन' बद्दल थोडंसं
कार्तिक आर्यनचा 'चंदू चँपियन' सिनेमा हा मराठमोळे जिगरबाज लढवय्ये मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. मुरलीकांत यांना भारत-पाकिस्तान युद्धात ९ गोळ्या लागून अपंगत्व आलं. पुढे त्यांनी पॅरालिम्पिक पोहण्याच्या स्पर्धेत देशाला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. कार्तिक आर्यन सिनेमात प्रमुख भूमिका साकारतोय. याशिवाय मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सुद्धा सिनेमात खास भूमिकेत आहे. कबीर खान यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय