अबोली कुलकर्णी
नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही प्रकारांत आपला वेगळा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री किशोरी गोडबोले सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मेरे साई-श्रद्धा और सबुरी’ मालिकेत बायजा माँ च्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेचे ४०० भाग पूर्ण झाले असून मालिकेतील भूमिका ही माझ्यासाठी साई बाबांचा आशीर्वादच म्हणावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या मालिकेच्या निमित्ताने त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाविषयी मारलेल्या या गप्पा... * ‘मेरे साई’ या मालिकेत तुम्ही ‘बायजा माँ’ यांच्या भूमिकेत दिसत आहात. काय सांगाल तुमच्या व्यक्तिरेखेविषयी?- मी या मालिकेत बायजा माँ च्या भूमिकेत दिसत आहे. मी आणि माझे आई-बाबा साईबाबांचे निस्सीम भक्त आहोत आणि जेव्हा बायजा माँची भूमिका साकारण्यासाठी मला विचारणा झाली तेव्हा तो साईबाबांचा आशीर्वादच आहे असे मला वाटले. जेव्हा शोच्या टीमने मला ऑडिशनसाठी बोलावले, तेव्हा मी अतिशय उत्साहित झाले होते. बायजा माँ एक अतिशय कणखर स्त्री होती आणि त्या काळात हक्कांसाठी ती खंबीरपणे उभी राहत असे, साईबाबांवर तिची अढळ श्रद्धा होती आणि आमच्यामध्ये हाच भक्तीचा समान धागा होता. शिवाय, मालिकेचा दिग्दर्शक सचिन आम्ब्रे याच्याबरोबर या आधी सुद्धा काम केलेले असल्यामुळे पुन्हा त्याच्याबरोबर काम करताना एक वेगळीच सहजता आणि आत्मविश्वास जाणवत आहे. मालिकेतील या भूमिकेत काही चांगली कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक आहे. बाबांच्या आशीवार्दाने बायजा माँ च्या भूमिकेत प्रेक्षक मला स्वीकारतील, असा मला विश्वास वाटतो.
* जेव्हा तुम्हाला शोची ऑफर आली तेव्हा तुमची रिअॅक्शन काय होती ? तुम्ही भूमिकेसाठी कोणती मेहनत घेतली?- खरंतर मी खूपच खूश झाले. मला हा साईबाबांचा आशीर्वादच वाटला. मी ३ वर्षांनंतर कमबॅक करणार असल्याने अशाच एखाद्या चांगल्या भूमिकेच्या शोधात होते. बायजा माँ ची भूमिका माझ्या मनाप्रमाणे होती. त्यामुळे भूमिकेसाठी मला मेहनत घ्यावी लागली. बोलण्याचा लहेजा, वागण्याची पद्धत, त्यांचे चरित्र वाचावे लागले. पण, या भूमिकेतून अनेक नव्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. मी या मालिकेचा भाग असल्यामुळे मला खूप अभिमान वाटत आहे.
* आत्तापर्यंत तुम्ही विविध भूमिका साकारल्या आहेत. भूमिकेतील आव्हान तुम्ही कसे शोधता?- माझ्यासाठी भूमिका, विषय आणि एकंदरितच कथानक या सर्व गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्याशिवाय भूमिका किती आव्हानात्मक आहे, हे देखील मी अगोदर लक्षात घेते. मी आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांप्रमाणेच ही बायजा माँ ची भूमिकाही आव्हानात्मक आहे.
* तुम्ही चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही प्रकारांमधून काम केले आहे. काम करताना कोणता फरक जाणवतो ?- होय, फरक तर जाणवतोच. कारण हे तिन्ही माध्यमं वेगवेगळी असून त्यांच्या काम करण्याच्या प्रकृती आणि गरजा वेगवेगळया आहेत. प्रत्येक माध्यमाचे आपले एक वैशिष्टय असते. त्यामुळे कलाकारही समृद्ध होत जातो.
* आता मालिकेमुळे तुमचे शेड्यूल बिझी असणार. मग स्वत:साठी वेळ कसा काढता?- सध्या शेड्यूल बिझी आहेच. पण जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा घरच्यांसाठी वेळ देण्याचा प्रयत्न करते. माझ्या घरचे सगळे खूपच समजूतदार आणि मला प्रोत्साहन देणारे आहेत. त्यांच्यामुळेच मी एवढया निष्ठेने माझे काम करू शकते.