कोराना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले असताना आणि अख्ख्या जगाने या व्हायरसचा धसका घेतला असताना कोरोनाचे रूग्ण सापडले म्हणून खूश होणारेही काही महाभाग आहेत. होय, भारतात कोरोनाचे रूग्ण आढळून आल्यानंतर एका अभिनेत्रीने आनंद व्यक्त केला आहे. होय, तेलगू सिने इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आणि निर्माती चार्मी कौर तिचे नाव. भारतात कोरानाचे रूग्ण आढळल्यानंतर तिने आनंद व्यक्त केला. मग काय, चार्मी अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल झाली. इतकी की, तिला माफी मागावी लागली.
चार्मीने सोमवारी एक टिकटॉक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिने भारतात कोरोना रूग्ण आढळल्या मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. ‘सर्वाना शुभेच्छा. कारण कोरोना व्हायरल दिल्लीत दाखल झाला आहे,’ असे ती या व्हिडीओत म्हणताना दिसली होती. तिच्या या व्हिडीओवर लोकांचे लक्ष गेले आणि लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.
लोकांच्या कमेंट्स वाचल्यानंतर चार्मीला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तिने माफी मागितली. ‘मी तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्या. या व्हिडीओसाठी मी माफी मागते. ही एका संवेदनशील विषयावरचे बालिश कृत्य होते. पुढे मी काळजी घेईल. याबद्दल मला फार माहिती नव्हती,’ अशा शब्दांत तिने सारवासारव केली.
म्हणे, कोरोना व्हायरल भारतात येऊ दे
चार्मीप्रमाणेच केआरके अर्थात कमाल आर खानही यानेही कोरोना व्हायरसबद्दल अकलेचे तारे तोडले. ‘ मी देवाकडे प्रार्थना करतो की, कोरोना व्हायरस भारतामध्ये येऊ दे. कदाचित त्यामुळे हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन हे सर्व भाऊ कोरोनाविरोधात एकत्र लढतील,’ असे ट्विट अलीकडे त्याने केले होते. केआरकेने याठिकाणी धार्मिक ऐक्य दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक ट्विटर युजर्सना त्याचे कोरोनाबद्दलचे हे वक्तव्य रूचले नाही. तोही ट्रोल झाला.