Join us  

दु:खद! ऑस्करसाठी निवडला गेलेला ‘Chello Show’मधील बालकलाकाराचं निधन, वयाच्या 10 व्या वर्षी कर्करोगाने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:52 AM

Chello Show Last Film Show : ‘छेलो शो’(लास्ट फिल्म शो) हा सिनेमा ऑस्कर 2023 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक दु:खद बातमी समोर आली आहे.

Chello Show Last Film Show : गुजरातच्या एका छोट्याशा गावातील मुलाच्या आयुष्यावर बेतलेला ‘छेलो शो’(लास्ट फिल्म शो) हा सिनेमाऑस्कर 2023 मध्ये (Oscar 2023) भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक दु:खद बातमी समोर आली आहे. होय, या चित्रपटातील बालकलाकार राहुल कोळी (Rahul Koli )आता आपल्यात नाही. वयाच्या 10 व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली. चित्रपटाच्या रिलीजला उणेपुरे काही दिवस असताना राहुलने जगाचा निरोप घेतला. चित्रपटात  भावीन रबारीने लीड भूमिका साकारली आहे आणि राहुल कोळीने त्याच्या मित्राची भूमिका साकारली आहे.राहुल कोळी ल्युकेमिया आजाराने ग्रस्त होता. गत 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील कॅन्सर रूग्णालयात त्याला भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. त्याच्या कुटुंबियांनी सोमवारी जामनगरजवळील त्यांच्या मूळ गावी हापा येथे प्रार्थना सभा घेतली. राहुलचे वडील रामू ऑटोरिक्षा चालवतात. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी त्याच्या निधनाने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.

मुलाच्या जाण्याने राहुलच्या वडिलांनाही मोठा धक्का बसला आहे. ते म्हणाले, ‘माझा मुलगा खूप आनंदी होता. त्याचा सिनेमा रिलीज होणार होता. बाबा, 14 तारखेनंतर आपलं आयुष्य एकदम बदलून जाईल, असं तो मला म्हणाला होता. पण त्याआधीच तो आम्हाला सोडून गेला.’ 

राहुलचा गेल्या चार महिन्यांपासून गुजरातच्या कॅन्सर रिसर्च इंन्स्टिट्यूट, अहमदाबादेत उपचार सुरू होता. चित्रपटाच्या शूटींगनंतर राहुलच्या या आजाराबद्दल कुटुंबीयांना कळलं होतं. त्याला सौम्य ताप येत होता. औषधोपचारानंतरही त्याचा ताप उतरत नव्हता. रविवारी 9 ऑक्टोबरला राहुलचा ताप वाढला. त्याला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. यानंतर त्याचं निधन झालं.

‘छेला शो’ हा सिनेमा 14 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.  ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत प्रवेश  म्हणून या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांनी केले आहे. गुजरातमधील सौराष्ट्र या भागातल्या एका खेड्यातली ही गोष्ट आहे. या खेड्यामध्ये राहणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते.

टॅग्स :ऑस्करसिनेमा