Join us

Chello Show Movie Review : कसा आहे भारताचं ऑस्करमध्ये प्रतिनिधित्तव करणार 'छेल्लो शो' सिनेमा?, वाचा रिव्ह्यू

By संजय घावरे | Published: October 15, 2022 5:27 PM

Chello Show Movie Review :‘छेल्लो शो’(लास्ट फिल्म शो) हा सिनेमा ऑस्कर २०२३ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. जाणून घ्या कसा आहे हा सिनेमा

कलाकार : भाविन राबरी, भावेश श्रीमाली, रिचा मीना, दिपेन रावल, परेश मेहता, विकास बाटा, राहुल कोळी, शोबन माकवा, किशन परमार, विजय मेरदिग्दर्शक : पॅन नलीननिर्माते : पॅन नलीन, धीर मोमाया, सिद्धार्थ रॅाय कपूर, मार्क ड्युअलशैली : रिअॅलिस्टीक ड्रामाकालावधी : एक तास ५० मिनिटेस्टार - साडे तीन स्टारचित्रपट परीक्षण - संजय घावरे

प्रत्येक सिनेमा कोणतीतरी गोष्ट सांगत असतो, पण हा सिनेमा पूर्वीच्या काळातील रिळांमधील सिनेमाची गोष्ट सांगणारा आहे. पूर्वी रिळांच्या माध्यमातून सिनेमा दाखवला जायचा. आज प्रगत तंत्रज्ञानाच्या बळावर युएफओद्वारे सिनेमा पहायला मिळतो. सिनेसृष्टीतील या खूप मोठ्या बदलानंतर रिळांचा सिनेमा नेमका कुठे गायब झाला? त्याचं काय झालं? प्रोजेक्टर कुठे गेले? याची गोष्ट दिग्दर्शक पॅन नलीन यांनी या चित्रपटात सादर केली आहे.

कथानक : चित्रपटाची गोष्ट शाळेतील समय नावाच्या मुलाभोवती गुंफण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनवर चहाचा स्टॅाल चालवणाऱ्याचा मुलगा असलेल्या समयला शाळेऐवजी सिनेमांवर जास्त प्रेम असतं. पैसे नसल्यानं त्याला सिनेमा पहायला मिळत नसतो. एक दिवस प्रोजक्टर चालवणाऱ्या फझलभाईशी त्याची भेट होते. समयची आई उत्तम स्वयंपाकीण असते. दररोज चवीष्ट पदार्थ ती समयला टिफीनमध्ये देत असते. इथेच समयचं काम फत्ते होतं. आयुष्यात कधीच चविष्ट खायला न मिळालेला फझल टिफिनच्या बदल्यात समयला प्रोजेक्टर रूममधून सिनेमा पाहण्याची संधी देतो. सारं सुरळीत सुरू असतं, पण कुठेतरी माशी शिंकते आणि समय सिनेमापासून दूर जातो. त्यानंतरची गोष्ट या चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : एका सिनेवेड्या लहान मुलाची कथा अत्यंत साधेपणानं आणि वास्तवदर्शी शैलीत चित्रीत करण्यात येणं हेच या चित्रपटाचं सर्वात मोठं बलस्थान आहे. गरीब घरातील एक सिनेवेडा मुलगा केवळ बारकाईनं केलेल्या निरीक्षणातून काय करू शकतो ते यात पहायला मिळतं. सिनेमाची वनलाईन सुरेख आहे. समय आणि त्याचे मित्र सिनेमाचं तंत्र कसं आत्मसात करतात, त्यासाठी काय-काय उपद्व्याप करतात, ते कसा स्वत:चा सिनेमा बनवतात, बदलाचे वारे वाहिल्यानंतर रिळांमधील सिनेमा कुठे जातो, रिळांचं काय होतं, प्रोजेक्टरची काय अवस्था होते आणि शेवटी इतके बदल होऊनही सिनेमा कसा अजरामर रहातो या प्रश्नांची उत्तरं अतिरंजतपणाला थारा न देता देण्यात आली आहेत. हे सर्व करताना सिनेमाची गती थोडी मंदावल्यासारखी वाटते. गुजराती शैलीतील पाककृती, रेसिपींचं सादरीकरण आणि कॅमेरावर्क एखाद्या कुकींग शोलाही लाजवेल अशी आहे. मुलांनी चोरी करण्याचा मुद्दा खटकतो. कलात्मक चित्रपटांच्या पठडीत मोडणाऱ्या या चित्रपटात माससाठी काही नाही. चित्रपटाची भाषा गुजराती असली तरी इंग्रजी सबटायटल्स असल्यानं समजायला सोपं जातं.

अभिनय : समयच्या भूमिकेत वास्तवदर्शी अभिनय करत भाविन राबरी प्रभावित करतो. त्याच्या जोडीला भावेश श्रीमालीनं साकारलेला फझलही अफलातून झाला आहे. रिचा मीनानं केलेल्या रेसिपी इतर गृहिणींसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या असून, दिपेन रावलनं रंगवलेला बापूजीही चांगला आहे. मुख्य भूमिकेतील कलाकारांना परेश मेहता, विकास बाटा, राहुल कोळी, शोबन माकवा, किशन परमार, विजय मेर आदी कलाकारांची सुरेख साथ लाभली आहे.

सकारात्मक बाजू : संकल्पना, दिग्दर्शन, अभिनय, लोकेशन्स, सिनेमॅटोग्राफी, वातावरणनिर्मितीनकारात्मक बाजू : गती थोडी मंद वाटते, क्लाससाठी असल्यानं मासची निराशा होईल.थोडक्यात : एका सिनेवेड्या मुलाच्या जिद्दीची कथा 'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता...' अशी काहीशी प्रचिती देणारा असल्यानं पालकांसह लहान मुलांनीही एकदा पहायला हवा.