Chhaava: विकी कौशलच्या ब्लॉकबस्टर 'छावा' चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. विकी कौशलच्या अभिनयाचं तर प्रेक्षक आणि समिक्षकांनी कौतुक केलेच आहे. पण, विकीसोबतच 'छावा'मधील आणखी एका अभिनेत्याची प्रचंड चर्चा सुरू आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा अभिनेता २००२ पासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. पण, आता तब्बल २३ वर्षांच्या मेहनतीनंतर 'छावा' चित्रपटातून अभिनेत्याला प्रेक्षकाचं प्रेम, प्रसिद्धी आणि चित्रपटसृष्टीत खरी ओळख मिळाली आहे.
हा अभिनेता आहे 'छावा'मधील कवी कलश म्हणजे विनीत कुमार सिंग (Vineet Kumar Singh). अभिनेत्याला मोठ्या संघर्षानंतर मोठं यश मिळालं आहे. 'छावा'मध्ये त्याने साकारलेल्या कवी कलश भुमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळतंय. विनीत कुमार सिंगचा आतापर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता. त्यानं अनेकदा अपयशाचा सामना केलाय. स्ट्रगलिंगच्या काळात तो शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याला पाहून प्रेरणा घ्यायचा. निराश झाल्यानंतर 'मन्नत' बंगल्यासमोर जाऊन बसायचा, 'मन्नत' बंगल्याला पाहिल्यानंतर त्याला खूप धाडस मिळायचं. हे खुद्द विनीतने सांगितलं आहे. विनीतने मन्नतला आशेचे प्रतीक म्हटलं.
अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले की, "जेव्हा मला वाईट वाटायचं, तेव्हा मी शाहरुख खानच्या मन्नतबाहेर बसायचो. चहा प्यायचो आणि त्याकडे पाहात राहायचो. मन्नत हे एक असं नाव आहे जे सांगतं की या शहरात तुमचंही घर असू शकतं. मन्नत हे स्वप्न पाहणाऱ्यांना ते टिकवून ठेवण्यासाठी धैर्य देतं. हे शहर एक जादुई शहर आहे, तुम्हाला कधी काहीतरी मिळेल आणि तुमची गाडी कधी चालू लागेल हे तुम्हाला कधीच कळणार नाही". 'छावा'नंतर गेल्या शुक्रवारी विनीत पुन्हा एकदा 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर आला आहे.