छत्रपती संभाजीराजेंवरील छावा सिनेमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे थिएटरनी वेगवेगळ्या वेळेचे नेहमीप्रमाणे शो ठेवले आहेत. असे असले तरीही थिएटरची तिकीटे भराभर संपत आहेत. यामुळे काही ठिकाणी मध्यरात्रीनंतर, पहाटेही शो ठेवण्यात आले आहेत. रात्री १ वाजता आणि पहाटे ५ वाजताही शो ठेवल्याचे तिकीट बुकिंगवेळी दिसत आहेत.
छावा सिनेमाचा हा पहाटेचा शो पुण्यातील सातारा रोडवरील सिटी प्राईडने ठेवला होता. रविवारी मध्यरात्री १२.५० मिनिटांनी तसेच पहाटे ५.५० मिनिटांनी हे शो ठेवण्यात आले होते. आजही अनेक ठिकाणी मध्यरात्रीला शो सुरु होणारी वेळ ठेवण्यात आली आहे. यावरून छावा चित्रपटाला प्रेक्षकांकडून होणारी मागणी किती मोठी आहे हे दिसत आहे.
'छावा' सिनेमा थिएटरमध्ये हाउसफुल्ल गर्दीत सुरु आहे. सिनेमा पाहून प्रेक्षक भावूक झाल्याचं दिसून येतंय. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल याचे चाहते भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. प्रेक्षकांकडून मिळत असलेलं प्रेम पाहून विकी भारावून गेलाय. इन्स्टाग्रामवर त्यानं खास पोस्ट शेअर केली आहे. आनंद व्यक्त करत त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. त्यानं लिहलं, "तुमच्या सर्वांचं प्रेम पाहून माझं मन भरुन आलयं. सर्वांचे खूप खूप आभार", या शब्दात तो व्यक्त झाला.
'छावा'ची कमाई किती?
'छावा'ने बॉलिवूडला २०२५ वर्षाची दमदार सुरुवात करून दिली आहे. तर विकीसाठी 'छावा' हा त्याच्या आजवरच्या सिनेमांपैकी सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, 'छावा'नं पहिल्या दिवशीच तब्बल ३३.१ कोटींचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी ३९.३ कोटींची कमाई केली. तर सॅकनिल्कच्या पोर्टनुसार, तिसऱ्या दिवशी अर्थात रविवारी ४८.५ कोटी एवढी कमाई केली आहे. अशाप्रकारे एकूण १२० कोटींच्या पार हा आकडा पोहोचला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित'छावा'चित्रपटाच्या निर्मितीसाठी १३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चित्रपटाची कमाई पाहता लवकरच निर्मिती खर्च वसूल होईल असं दिसत आहे.