Rashmika Mandanna: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) तिच्या अभिनयासह, निखळ सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करते आहे. नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचं 'पुष्पा-२' तसेच 'अॅनिमल' या चित्रपटांमुळे तिचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. आता लवकरच रश्मिका 'छावा' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा चित्रपटात रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांची म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर 'छावा'मध्ये अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनाला फक्त एक दिवस उरला आहे. त्यापूर्वी चित्रपटाची संपूर्ण टीम वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देताना दिसत आहे. नुकतंच रश्मिका आणि विकी कौशल शिर्डीला जाऊन साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यावेळी अभिनेत्रीने चाहत्यांसोबत मराठीत संवाद साधला.
सोशल मीडियावर रश्मिका मंदाना आणि विकी कौशल यांचा साई दर्शनाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क विकी कौशल रश्मिकाला मराठीचे धडे देताना दिसतोय. शिर्डीमध्ये येताच रश्मिकाने चाहत्यांशी मराठीत संवाद साधून त्यांचं मन जिंकलं. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्रीला मीडियासोबत बातचीत केली. त्यादरम्यान, मी पहिल्यांदा शिर्डीला आली आहे. त्यामुळे आपण प्रचंड खुश असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या. त्यावेळी रश्मिकाला शिर्डीत येऊन कसं वाटलं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विकी रश्मिकाला मराठी बोलण्यासाठी मदत करताना दिसतोय. त्यानंतर माध्यमांच्या या प्रश्नाचं उत्तर देत रश्मिका म्हणते- "खूप छान वाटलं...!" रश्मिका मंदानाचं मराठीतील संभाषण ऐकून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, रश्मिकाचा रॉयल लूक आणि विकीची दमदार भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.