Join us

लोक मला मारायला निघालेत...'छावा'मध्ये गणोजीच्या भूमिकेत दिसलेल्या सारंग साठ्येची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:07 IST

मी प्रेक्षकांचा रोष स्वीकारायला तयार आहे, सारंग साठ्ये म्हणतो...

'भाडिपा' या मराठी कंटेंट चॅनलचा संस्थापक, अभिनेता सारंग साठ्ये सिनेमांमधून छोट्या छोट्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. नुकताच तो सध्या तुफान गाजत असलेल्या 'छावा' मध्येही दिसला. यामध्ये सारंग गणोची या नकारात्मक भूमिकेत होता. तर त्याच्या जोडीला  अभिनेता सुव्रत जोशी कान्होजीच्या भूमिकेत होता. दोघांचं पात्र हे चीड आणणारं होतं जे त्यांनी पडद्यावर चांगल्या पद्धतीने साकारलं. नुकतंच सारंगने याबद्दल भाष्य केलं आहे.

गणोजी भूमिकेनंतर प्रेक्षकांचा काय प्रतिसाद मिळाला? यावर एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत सारंग साठ्ये म्हणाला, " प्रेक्षक मला मारायला निघालेत. त्यामुळे मी प्रेक्षकांच्या प्रतिसादावर फारसं बोलणार नाही. आणि बरोबरच आहे ती काही साधी गोष्ट नव्हती. स्वराज्याला तडा जाईल अशी गोष्ट त्या पात्राने केली होती. त्यामुळे अर्थातच त्यांचा रोष मी स्वीकारायला तयार आहे."

तो पुढे म्हणाला, "लक्ष्मण सरांनी आम्हाला कास्ट केलं यामागे त्यांचं एक कारण होतं. त्यांचं म्हणणं होतं की दोन असे कलाकार जे एरवी अत्यंत गोड कामं करतात. यापूर्वी कधीही ज्यांनी नकारात्मक भूमिका केलेल्या नाहीयेत. अशा दोघांनी जर ही भूमिका केली तर कदाचित लोकांना आधी समजणारच नाही की पुढे जाऊन असं काहीतरी होणारे. त्यामुळे नंतर ते त्यांच्या आणखी जिव्हारी लागेल. म्हणून त्यांनी आम्हाला कास्ट केलं होतं. आमच्या मनात धाकधूक होती पण लक्ष्मण सरांना माहित होतं की हे नीट होणार. त्यामुळे सगळं श्रेय त्यांचंच आहे."

सध्या 'छावा'सिनेमाने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत आहे. आतापर्यंत सिनेमाने ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र दुसरीकडे खऱ्या आयुष्यात गणोजी-कान्होजी शिर्केंच्या वंशजांनी सिनेमावर आक्षेप घेतला आहे. गणोजी-कान्होजी मुघलांना वाट दाखवतात असं सिनेमात आहे याचा त्यांनी विरोध केला आहे. याप्रकरणी त्यांनी मेकर्सला नोटीसही पाठवली आहे. तर दुसरीकडे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्टीकरण देत सिनेमात शिर्के नाव, त्यांचं गाव कुठेही दाखवण्यात आलं नव्हतं असा खुलासा केला. तरी भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असंही ते म्हणाले.

टॅग्स :'छावा' चित्रपटबॉलिवूडसुव्रत जोशीमराठी अभिनेता