>>कोमल खांबे
"पूरी खानदान की लाश पे खडे होकर हमने ये ताज पहना था, इसे दोबारा उसी वक्त पहनेंगे जब उस संभा की चीखे पूरी हिंदुस्तान मे गुंजेगी..."
मराठ्यांच्या दख्खनवर राज्य करण्यासाठी आसुसलेला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरची राख केल्यावर अस्वस्थ झालेल्या औरंगजेबाला मुघलांचा ताज शंभूराजेंच्या मृत्यूनंतरही पुन्हा त्याच दिमाखात डोक्यावर चढवता आला नसेल कदाचित...पण, अक्षय खन्नाने मात्र त्याच्या अभिनयाचा ताज औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेवर निश्चितच चढवला आहे.
जेवढा तगडा हिरो तेवढाच ताकदीचा व्हिलन असेल तरच सिनेमाला दुहेरी रंगत चढते. 'छावा'मध्ये विकी कौशलच्या अभिनयाला तोड नाही. त्याने साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ही तुमच्या डोळ्यांत पाणीच आणते. पण, विकी कौशलला अभिनयाने तोडीस तोड उत्तर देत अक्षय खन्नाने औरंगजेब पडद्यावर अक्षरश: जिवंत केला आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे हे जर सांगितलंच नसतं, तर मला वाटतं त्याला ओळखणं आपल्यापैकी कित्येक जणांना जमलंही नसतं. आजपर्यंत सिनेमांमधून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसलेल्या कित्येक अभिनेत्यांनी छाप पाडली. पण, तेवढाच ताकदीचा व्हिलन साकारून प्रेक्षकांना घाम फोडणारा अक्षय खन्ना पहिलाच असावा.
अगदी किरकोळ शरीरयष्टी, तरुणपणात केस गेले आणि टक्कल पडलं म्हणून खचून गेलेला हा अभिनेता. 'ताल', 'दिल चाहता है', 'बॉर्डर', 'रेस' हे त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या कारकीर्दीतले काही सिनेमे ज्यातील काही भूमिका गाजल्या. पण, अक्षय खन्नाला प्रेक्षकांवर त्याची विशेष अशी छाप काही पाडता आली नाही. टक्कल पडल्याने आत्मविश्वास गमावल्यानंतर तो फारसा सिनेमात दिसलाही नाही. पण, २०२२ साली आलेल्या 'दृश्यम २'मधून त्याने जोरदार कमबॅक केलं. या सिनेमात त्याने साकारलेली ऑफिसरची भूमिकाही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणला टक्कर देणारी ठरली होती. त्यानंतर आता 'छावा'मध्ये अक्षय खन्नाने साकारलेला औरंगजेब म्हणजे जणू त्याने त्याच्या अभिनयाला पाडलेले कित्येक पैलू आहेत.
करारी नजर, भेदक आवाज, क्रुरतेच्या सीमा गाठलेला औरंगजेब...आपल्यापैकी औरंगजेब हा फारसा पुस्तकातही कोणी पाहिलेला नसेल. शिवरायांच्या मृत्यूनंतर झालेला आनंद, संभाजी महाराजांना कैद करून त्यांची हत्या केल्यानंतरही डोळ्यांत दिसणारी हतबलता, वडिलांना मारून मिळवलेला मुघलांचा ताज आणि स्वत:च्याच लेकाची सुपारी देणारा औरंगजेब हे फक्त ऐकूनच तो किती क्रूर असेल या भावनेने थरकाप उडतो. पण, अक्षय खन्नाने मात्र या औरंगजेबाची प्रतिमा अगदी खरी वाटावी अशी उभी केली. म्हणूनच सिनेमा पाहतानाही आपल्याला द्वेषाबरोबरच औरंगजेबाला बघताच काही वेळेस घामही फुटतो. कलाकृतीला पुरेपूर न्याय देणं आणि व्हिलन असूनही तितक्याच ताकदीने ती उभी करणं हे अवघड काम. पण, अक्षय खन्नाला त्याच्या या भूमिकेसाठी द्यावी तितकी दाद कमीच आहे. त्याच्या संपूर्ण करिअरवर ही भूमिका ओवाळून टाकण्यासारखी आहे. आणि म्हणूनच छावानंतर औरंगजेब म्हटलं की अक्षय खन्ना डोळ्यासमोर उभा राहील, यात शंका नाही.